News Flash

‘एल्गार’ आयोजकासह चौघे अटकेत भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण

नागपूर, मुंबई, दिल्लीत पोलिसांची कारवाई

नागपूर, मुंबई, दिल्लीत पोलिसांची कारवाई

भीमा-कोरेगाव येथे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून मुंबई, नागपूर, दिल्लीत कारवाई करण्यात आली. भीमा-कोरेगाव हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे यांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबईतील गोवंडी भागातून ढवळे यांना बुधवारी पहाटे ताब्यात घेतले. त्या पाठोपाठ नागपूर येथून अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक करण्यात आली, तसेच दिल्लीतून रोनी विल्सन यांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. एल्गार परिषदेत करण्यात आलेले चिथावणी देणारे भाषण तसेच सादर करण्यात आलेल्या गीतांमुळे हिंसाचारास खतपाणी मिळाले. त्यामुळे ढवळे, अ‍ॅड. गडलिंग, राऊत, विल्सन, सेन यांच्या घरांवर दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांच्या पथकाने छापे टाकले होते. तेथून काही पुस्तके तसेच भित्तिपत्रके जप्त करण्यात आली होती. पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चौघांना गुरुवारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भीमा-कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जमले होते. त्या वेळी दोन गटांत झालेल्या वादातून नगर रस्त्यावर हिंसाचार झाला. शेकडो वाहने पेटवून देण्यात आली, तसेच दगडफेक करण्यात आली होती. ३१ डिसेंबर रोजी पुण्यात शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेत चिथावणी देणारी भाषणे दिल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. एल्गार परिषदेच्या आयोजनात सुधीर ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांकडून हिंसाचारप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकबोटे यांना अटक करण्यात आली. मात्र, भिडे गुरुजींनाही अटक व्हावी, या मागणीवर अद्याप कार्यवाही झालेली नाही.

अटकेमागची पोलिसांची कारणे

सुधीर ढवळे हे रिपब्लिकन पँथर्सच्या माध्यमातून विद्रोही चळवळीशी जोडले गेले आहेत. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात त्यांचा सहभाग होता. एल्गार परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळला. नागपूर येथील अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग हे नक्षलवादी चळवळीतील आरोपींचे वकीलपत्र घेतात. नक्षलवाद्यांचे खटले ते चालवतात. महेश राऊत मूळचे गडचिरोलीचे आहेत. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून त्यांनी शिक्षण घेतले आहे. राऊत हे नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याचा आरोप आहे. नक्षलवादी चळवळीचा नेता प्रा. साईबाबा यांचा निकटवर्तीय म्हणून रोनी विल्सन ओळखला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:31 am

Web Title: bhima koregaon violence case
Next Stories
1 गदिमांच्या निवडक कथा आता इंग्रजीमध्ये!
2 शिवराज्याभिषेकानंतर रायगडावरुन उतरताना डोक्यात दगड पडून एका शिवभक्ताचा मृत्यू
3 मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेना वाचवण्यासाठी पाच जणांना अटक, एल्गार परिषदेच्या संयोजकांचा आरोप