भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी गुरुवारी पुणे सत्र न्यायालयात पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचे नाव या आरोपपत्रामध्ये आहे. एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन जून महिन्यात पुणे पोलिसांनी या पाच जणांना अटक केली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.डी.वदने यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे तपास अधिकारी एसीपी शिवाजी पवार यांनी ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केले. पुण्यातील रहिवाशी तुषार दामगुडे यांनी ८ जानेवारी रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पँथरच्या हर्षाली पोतदार आणि सुधीर ढवळे यांची नावे घेतली होती तसेच कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप यांची नावे घेतली होती.

सीपीआय-माओवाद्याच्या रणनितीनुसार आरोपींनी दलितांची दिशाभूल करुन त्यांच्या मनात हिंसाचाराचा विचार पसरवले असा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी ६ जून रोजी विल्सन, गडलिंग, सेन, राऊत आणि ढवळे यांना अटक केली. एल्गार परिषदेला संशयितांनी निधी पुरवला असा आरोप पोलिसांनी केला आहे. सर्वांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कलमाअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. २८ ऑगस्टला दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्नन गोन्सालविस, अरुण फरेरा आणि गौतम नवलखा या पाच प्रख्यात कार्यकर्त्यांना सीपीआय माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक केली.