भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिली आहे. संभाजी भिडेंना दंगल घडवताना पाहिले, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांकडे दिली होती. मात्र, पोलीस चौकशीत असा कोणताही पुरावा आढळलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत दिली.

राज्यातील कायदा- व्यवस्थेवरुन विधान सभेत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत उत्तर दिले. भीमा- कोरेगावबाबत फडणवीस म्हणाले, भीमा कोरेगाव हिंसाचाराबाबत विधान सभेत अनेक सदस्यांनी माहिती दिली. भीमा कोरेगावमध्ये राज्य सरकारने चोख बंदोबस्त ठेवला होता. भीमा कोरेगावला २०० वर्ष पूर्ण झाल्याने गर्दी होईल, याची कल्पना होती. त्या ठिकाणी १ पोलीस अधीक्षक, २ अप्पर पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक असे अधिकारी नेमण्यात आले होते. याशिवाय पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही तिथे तैनात करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

भीमा कोरेगावमधील एक फलक लावण्यात आला, त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली. यानंतर तोडफोडीची घटना घडली. या प्रकरणी अॅट्रोसिटीअंतर्गत काही लोकांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, यानंतर दोन्ही समाजातील मंडळीनी बैठक घेऊन काही लोकांवरील गुन्हे मागे घेतले, असे त्यांनी सांगितले. १ जानेवारी रोजी दोन्ही समाज समोरासमोर येणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली होती. मात्र, तोडफोडीला सुरुवात पार्किंगमध्ये झाली. तिथे पोलीस बंदोबस्त कमी होता, असे त्यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि त्यानंतर राज्यभरात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी एकूण १२०० लोकांना अटक करण्यात आली. या घटनांमध्ये एकूण १३ कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहितीही त्यांनी दिली. मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अटक केली, हा दावा खोटा आहे. आम्ही त्यांच्या अटकेसाठी पथकं तयार केली होती, असे त्यांनी नमूद केले.

संभाजी भिडे व एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात संभाजी भिडेंविरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे त्यांनी सांगितले. तक्रार करणाऱ्या महिलेचा महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर इन कॅमेरा जबाब घेण्यात आला. तिने देखील संभाजी भिडेंना तिथे प्रत्यक्ष पाहिले नाही. मात्र, तिथे स्थानिक जी चर्चा करत होते त्यात संभाजी भिडेंच्या नावाचा उल्लेख केला जात होता, म्हणून तक्रारीत त्यांचे नाव सांगितले, असे जबाबात म्हटल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. संभाजी भिडे व त्यांच्यासोबतचे आठ ते दहा लोकं आहेत त्यांचा मोबाईल लोकेशन त्या भागातले नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. या घडामोडींनंतरही सरकारने चौकशी बंद केलेली नाही, असे त्यांनी सभागृहाला सांगितले.  या प्रकरणात सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

तक्रारीत नेमका उल्लेख काय?
भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ज्या तक्रार अर्जाच्या आधारे दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये संबंधित तक्रारदार महिलेने आपण या दंगलीवेळी भिडे गुरुजी यांना दगड मारताना पाहिले असल्याचे म्हटले होते.