भीमा कोरेगाव हिंसाचारातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे शुक्रवारी दुपारी पोलीस ठाण्यात हजर झाले. सुप्रीम कोर्टाने अटकेपासून दिलासा दिल्याने पोलीस त्यांची चौकशी करु शकतील, पण त्यांना अटक करता येणार नाही.

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत १४ मार्चपर्यंत वाढवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले होते. त्यामुळे आता पोलिसांना एकबोटेंची चौकशी करता येईल, मात्र कोर्टाच्या आदेशामुळे त्यांना अटक करता येणार नाही.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले होते. एकबोटेंना आत्तापर्यंत अटक का केली नाही, असा सवाल कोर्टाने विचारला होता. न्या. जोसेफ कुरियन आणि न्या. मोहन शांतरगौडर यांच्या खंडपीठाने एकबोटेंना दिलासा देतानाच १४ मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये मुख्य आरोपीची चौकशी करावी आणि त्या आधारे तपासाचा अहवाल आम्हाला पुढील सुनावणीपूर्वी द्यावा, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.

आता एकबोटे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या एकबोटेंना अटक केली तरी कोर्टाच्या आदेशामुळे लगेचच व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मिळू शकतो.

प्रकरण काय?
भीमा कोरेगावच्या लढाईला दोनशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने तेथील विजयस्तंभाजवळ जमलेल्या दलित समाजाविरुद्ध इतरांना भडकावून हिंसाचार घडवल्याचा आरोप एकबोटे यांच्याविरुद्ध आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ३०७, १४३, १४८, १४९ आणि २९५ नुसार गुन्हे दाखल केला होता.