भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात जीव गमावणाऱ्या राहुल फटांगडेचा मृत्यू होऊ पाच महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्याप त्याच्या मारेकऱ्यांना शोधण्यास हे सरकार अपयशी ठरले असून राज्याचे गृहमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल फटागंडेचा भाऊ रोहित फटांगडे याने केली आहे.

शुक्रवारी राहुल फटांगडे याच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जारी केली असून मारेकऱ्यांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सीआयडीने केले आहे. या पार्श्वभूमीवर राहुलचा भाऊ रोहित फटांगडे याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी हजारो अनुयायी शौर्यस्तंभास अभिवादन करण्यासाठी येतात. यंदा २०० वर्षे होत असल्याने अनुयायी मोठ्या संख्येने येतील, असा अंदाज होता. मात्र, तरी देखील प्रशासनाने पोलिसांची संख्या वाढवली नाही. यात झालेल्या हिंसाचारात माझ्या भावाचा जीव गेला असून या घटनेला पाच महिन्याचा कालावधी झाला आहे. पण अद्यापही त्याच्या मारेकाऱ्याना पकडण्यात पोलीस आणि सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे राज्याच्या गृहखात्याची धूरा असलेला देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहितने केली.