भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली आहे. अकलूजमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते याचवेळी शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही ताशेरे झाडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि व्यथाही शरद पवारांनी त्यांच्या भाषणात मांडली. आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो आणि सरकार खाणाऱ्यांचा विचार करते आहे. सरकारने आता त्यांचे धोरण बदलण्याची गरज आहे. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल ही गोष्ट सरकारने लक्षात घेतली पाहिजे असेही शरद पवारांनी म्हटले आहे. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर टीका केली होती. ४०-४० टन उस उत्पादकांना कर्जमाफी हवी? असा प्रश्न विचारला होता. मात्र शेतकऱ्याची अवस्था खरंच वाईट आहे हे त्यांना ठाऊक नसावे असा टोला शरद पवारांनी संभाजी भिडे गुरुजींचे नाव न घेता लगावला.

सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी देशाचा विकास दर घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेती विकास दर घसरण्याचाही अंदाज व्यक्त झाला आहे. शेतीकडे सपशेल दुर्लक्ष करण्याचे धोरण या गोष्टीसाठी कारणीभूत आहे असाही आरोप यावेळी शरद पवारांनी केला.

बँकांची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ८० हजार कोटी रूपये भरले पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना, त्याच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी करताना या सरकारच्या पोटात दुखते. अकलूज येथील महिला वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी ही टीका केली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचीही उपस्थिती होती. नवीन करप्रणाली आणि नोटाबंदी या दोन्ही निर्णयांमुळे देशाची आर्थिक अवस्था बिकट आहे असेही मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.

काँग्रेस राष्ट्रवादीने एकसंघ राहण्याची गरज
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. ही समाधानाची बाब आहे. या सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. असे झाले तरच या सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ शकू असेही मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhima koregaon violence was created by outsiders the government should find them says sharad pawar
First published on: 07-01-2018 at 15:44 IST