तापलेले भिरा भाग १

कोकणातील भिरा गावातील तापमानावरून उठलेल्या वादळानंतर भारतीय हवामान खात्याला आता जाग आली आहे. एकीकडे भिरात पावसाचे प्रमाण अधिक आहे आणि दुसरीकडे गावात गेल्या दहा वर्षांपासून सर्वाधिक तापमानाची नोंद केली जात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून हवामानतज्ज्ञांनी भारतीय हवामान खात्याला या एकूणच प्रकाराचा अभ्यास करण्याची गरज वर्तवली, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यंदा भिरामध्ये मार्च महिन्यातच विदर्भाचा उच्चांक मोडल्यानंतर हवामानतज्ज्ञांनी तापमान मोजण्याच्या पद्धतीवरच तोंडसुख घेतले आहे.

भिरामधल्या तापमानाच्या नोंदी भारतीय हवामान खाते नव्हे तर तिथल्या तहसील कार्यालयातला कर्मचारी घेतो. त्यामुळे तापमान नोंदीबाबत पूर्णपणे प्रशिक्षित नसलेल्या या कर्मचाऱ्याच्या नोंदीवर भारतीय हवामान खाते कसा विश्वास दाखवू शकते, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. वर्षांनुवष्रे भिराच्या बाबतीत हेच होत आले आहे. काही खासगी हवामान अभ्यासकांनी मुंबई, पुणे येथील हवामान केंद्रांना या चुकीच्या नोंदीबाबत सूचितही केले होते.

डोंगरांनी वेढलेल्या आणि घाटमाथ्यावरील या गावात पावसाचे प्रमाण अधिक आहे. असे असतानासुद्धा भिराचे तापमान कायम ४५ ते ५० अंश सेल्सिअसमध्ये फिरत असते. भिरा या गावातील २००५ मधील फेब्रुवारी ते मे या महिन्यांतील तापमानाच्या नोंदीवरून ते अधिक स्पष्ट होईल. भिरा गावातील तलावाजवळ एक वीजनिर्मिती केंद्र आहे. तापमापक यंत्र या केंद्राच्या आसपास असल्यास त्याचाही परिणाम तापमानाच्या नोंदीवर होऊ शकतो. तापमापन यंत्रात समस्या होऊ शकते, ज्या ठिकाणी हे यंत्र लावले आहे ते ठिकाण चुकीचे असू शकते किंवा मोजणी करणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला तापमानाचे प्रशिक्षण व्यवस्थित नसावे, हे आता भारतीय हवामान खाते मान्य करत आहे. म्हणूनच त्यांनी भिरा गावात पथक पाठवले आहे. मात्र, हवामान खाते उशिरा जागे झाले असले तरीही राज्यातील इतर शहरांच्या तापमानाच्या नोंदीबाबत आता शंका निर्माण झाल्या आहेत. विदर्भात इतके उच्च तापमान शक्य आहे. मात्र, भिरामध्ये हे शक्य नाही, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. परंतु, भिरामुळे आता इतर ठिकाणच्याही तापमानाच्या नोंदीकडे हवामान विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

तापमानाच्या नोंदीचा इतिहास

  • २६ फेब्रुवारी २००५ रोजी ४७.५ अंश सेल्सिअस
  • १७ मार्च २००५ रोजी ४६.२ अंश सेल्सिअस
  • २७ एप्रिल २००५ रोजी ४९ अंश सेल्सिअस
  • २ मे २००५ रोजी ४७.५ अंश सेल्सिअस

भिरामुळे तापमान हा राज्यातील जनतेत चिंतेचा विषय बनला आहे. येत्या काळात तापमान ४८ अंश सेल्सिअसवर जाईल अशी अफवा समाजमाध्यमातून पसरत आहे. वास्तविक या काळात राज्यातील एकंदरीत तापमान ३५ ते ४४ अंश सेल्सिअस या श्रेणीत येते. लोकांना विशेष करून विदर्भातील लोकांना एवढय़ा तापमानाची सवय आहे; पण भिराच्या चुकीच्या तापमानामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला. भारतीय हवामान खात्याला खासगी हवामानतज्ज्ञांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून भिराच्या चुकीच्या तापमानाबाबत सजग करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीच खात्याने ही हालचाल केली असती तर हा संभ्रम निर्माण झाला नसता आणि खात्यावर नामुष्की ओढवली नसती. यानिमित्ताने का होईला राज्यात आता असे किती भिरा आहेत हे शोधणे गरजेचे झाले आहे.

अक्षय देवरस, हवामान अभ्यासक

भिरा या गावावर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही लक्ष ठेवून आहोत. कर्जतपासून केवळ ५० किलोमीटर अंतरावर भिरा आहे. कर्जतमध्ये ज्या दिवशी ४१ अंश सेल्सिअस तापमान होते आणि तेव्हा भिरा गावात ४६ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. ‘फुट ऑफ द घाट’ असे भिराचे लोकेशन असताना गेल्या अनेक वर्षांपासून वाढीव तापमानाचा अंदाज देणे सुरू आहे. विदर्भात अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी इतक्या तापमानाची नोंद समजू शकते, एवढेच नव्हे तर नागपुरातही ४८ अंश सेल्सिअसची नोंद आहे, पण भिरा गावात हे शक्यच नाही.

राजेश कपाडिया, ज्येष्ठ हवामान अभ्यासक, मुंबई