News Flash

स्थायी समितीच्या सभापतिपदी भोसले

महानगरपालिकेतील सत्ताधारी गटातील काँग्रेसमध्ये बंडाळी होऊनही चिठ्ठीचा कौल मात्र सत्ताधारी गटाच्या बाजूने गेला. त्यामुळेच मनपा स्थायी समितीच्या सभापतिपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोसले यांची निवड

| March 5, 2015 03:00 am

महानगरपालिकेतील सत्ताधारी गटातील काँग्रेसमध्ये बंडाळी होऊनही चिठ्ठीचा कौल मात्र सत्ताधारी गटाच्या बाजूने गेला. त्यामुळेच मनपा स्थायी समितीच्या सभापतिपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोसले यांची निवड झाली. विरोधकांनी या निवडणुकीत आर्थिक बाजार मांडल्याचा आरोप निवडीनंतर भोसले यांनी केला.
मनपा स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी समितीची सभा बोलावण्यात आली होती. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. दोन्ही काँग्रेस, मनसे व अपक्ष असा गट मनपात सत्तेत आहे. स्थायी समितीतही याच गटाचे बहुमत आहे. मात्र या गटातील अपक्ष सदस्य उषा ठाणगे विरोधी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या मदतीने या निवडणूक रिंगणात उतरल्या. काँग्रेसचे दीप चव्हाण यांनीही उघडपणे विरोधकांना साथ दिल्याने स्थायी समितीतील सत्ताधा-यांचे बहुमत संपुष्टात आले. सोळा सदस्यांच्या या समितीत दोन्ही गटांचे संख्याबळ समान झाल्याने अखेर चिठ्ठीवर हा कौल घ्यावा लागला. त्यात सत्ताधारी गटाचे गणेश भोसले यांना नशिबाने साथ दिली. त्यांचीच चिठ्ठी निघाल्याने स्थायी समितीच्या सभापतिपदी त्यांची निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी कवडे यांनी जाहीर केले.
स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी गटाकडून भोसले, शिवसेनेकडून छाया तिवारी व सत्ताधारी गटातील अपक्ष उषा ठाणगे अशा तिघांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सभेत अर्ज मागे घेण्याच्या वेळेत तिवारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सत्ताधारी गटाचे भोसले व भाजप-शिवसेनेच्या वतीने ठाणगे यांच्यात सरळ लढत झाली. दोघांना सोळापैकी प्रत्येकी आठ मते मिळाल्याने चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. सभेत हात वर करून मतदान घेण्यात आले.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनीच या निवडणुकीत बंड करून उघडपणे विरोधकांना साथ दिली. ते विरोधी गटात सामील झाल्यामुळेच समितीतील संख्याबळ समान झाले. चव्हाण यांनी सत्ताधारी गटातच राहावे यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांनी ते धुडाकावून लावत वेगळी चूल मांडली. सभेतच त्यांना  पक्षादेश बजावण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, मात्र त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हा व्हीप त्यांनी स्वीकारलाच नाही. सत्तादारी गटातील सदस्यांनी पक्षादेश सभेत वाचून दाखवण्याची विनंती पिठासीन अधिकारी कवडे यांना केली होती. मात्र त्यांनी ती फेटाळून लावली.
मनपाच्या लोकमान्य टिळक शाळेतील विद्यार्थी राहुल कांबळे याच्या हस्ते चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. तो भोसले यांच्या बाजूने जाताच मनसेसह सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी मनपा आवारातच जोरदार जल्लोष केला. निवडीनंतर कवडे तसेच महापौर तथा आमदार संग्राम जगताप आदींनी भोसले यांचे अभिनंदन केले. निवडीनंतर लगेचच त्यांनी या कक्षातच जाऊन पदभारही स्वीकारला.
हा आपला ऐतिहासिक विजय आहे. विरोधकांनी या निवडणुकीत पैशाचा बाजार मांडला. यात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली. मात्र नशिबाने आपल्याला साथ दिली. शिवाय काँग्रेसचे दोन सदस्य, राष्ट्रवादीचे सर्व व अन्य अपक्षांनी आपल्यालाच साथ दिली. आमदार अरुण जगताप व महापौर संग्राम जगताप या दोघांनी आपल्यावर विश्वास टाकत खंबीर साथ दिली. शहराच्या विकासाला आता वेगळी दिशा देऊ
नवे सभापती गणेश भोसले
आपल्यावर पक्षाचीही जबाबदारी आहे. मनसेला आपण मतदान करू शकत नाही. म्हणूनच अपक्ष उमेदवार  ठाणगे यांना उघड पाठिंबा दिला. शिवाय पक्षाने यात कोणता निर्णयही घेतला नव्हता. याबाबत आपले पक्षश्रेष्ठींशी बोलणेही झाले होते.
दीप चव्हाण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 3:00 am

Web Title: bhosle elected standing committee chairperson
Next Stories
1 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता सरसकट मदत
2 ‘शेतकरी आत्महत्या लाजीरवाणी बाब, दुष्काळावर कायमचे नियोजन गरजेचे’
3 पालकमंत्री-खा. खैरे वादावर जाहीर पडदा!
Just Now!
X