छगन भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद मंगळवारी रायगड जिल्ह्य़ातही उमटले. जिल्ह्य़ात विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. अलिबाग येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तहसीलदार यांना निवेदन दिले. यात भुजबळांना झालेल्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सोमवारी दिवसभर सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी सकाळीच अलिबाग येथील कार्यालयात जमा झाले. त्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले. भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने केलेली अटक बेकायदा आहे. अटकेची कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. सक्तवसुली संचालनालयामार्फत होत असलेल्या चौकशीला भुजबळ योग्य सहकार्य करीत होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी व सामान्य शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी भाजप सरकारने दबावाचे राजकारण करून भुजबळांना अटक केली आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकत्रे भुजबळ यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे .

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन पाटील, जिल्हा सरचिटणीस राजा केणी, जिल्हा संघटक ऋषिकांत भगत, तालुका युवक अध्यक्ष जगदीश घरत, माजी तालुका अध्यक्ष मिलिंद कवळे, संतोष निगडे, प्रवीण रनवरे, सुनील गुरव, मनोज शिर्के, धनंजय िशदे आदी उपस्थित होते.