मी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, परंतु त्यातही माझ्या बदनामीचे उद्योग सुरू आहेत. धनगर समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु आरक्षणाच्या मुद्यावरून आमच्यासारखी राजकारणी मंडळी जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत असल्याची नापसंती सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. आरक्षण हा राजकीय खेळ न बनता एकोप्याने सुटावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राहाता तालुक्यातील दाढ व संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलांच्या उद्घाटन कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ आदी या वेळी उपस्थित होते.
आरक्षणाचा प्रश्न रस्त्यावर उतरून नव्हे, तर सर्वाना बरोबर घेऊन सोडवावा लागेल असे भुजबळ यांनी सांगितले ते म्हणाले, आमच्यासारखी मंडळी लोकांना एकमेकांच्या विरोधात भडकविण्याचे काम करीत आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या या राज्यात आरक्षणावरून संघर्ष पेटणे हे सामाजिकदृष्टय़ा हिताचे नाही. यातून विद्वेशाच्याच िभती उभ्या राहतील. भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
विखे म्हणाले, वर्षांनुवर्ष प्रलंबित राहिलेल्या या भागातील रस्त्याच्या कामांना भुजबळ यांनी प्राधान्य दिले. कृषी विकासाबरोबरच संकटप्रसंगी राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
भाजप-शिवसेनेवर टीका
गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने राज्यातील रस्त्यांच्या कामांसाठी सीआरएफचा निधी न दिल्याने सर्व बोजा राज्याच्या अंदाजपत्रकावर पडला आहे, असे भुजबळ म्हणाले. यूपीए सरकारवर टीका करीत बीओटी तत्त्व राज्यात प्रथम भाजप-सेनेच्याच सरकारने आणले, मात्र ज्यांनी हा पर्याय शोधला तेच आता टोलमुक्त महाराष्ट्राचे नारे देत आहेत. त्यांनी आधी गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थानमधील रस्ते टोलमुक्त करून दाखवावे असे आव्हान भुजबळ यांनी दिले.