काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून गदारोळ सुरूच आहे. त्या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून होत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी या वादावर मत मांडले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नागरिकत्व कायदा आदी मुद्यांवरून काँग्रेसनं शनिवारी दिल्लीत भारत बचाओ रॅली आयोजित केली होती. या रॅलीत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, “संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी मला माफी मागायला सांगितलं जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही. माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणतीही काँग्रेसमधील व्यक्ती माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल,” असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं.

राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून वाद सुरू झाला आहे. भाजपानं राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. या वादावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी भूमिका मांडली आहे. भुजबळ म्हणाले, “जेव्हा मोठ्या व्यक्तींचा विषयी असतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकजण सहमत असेल असं नाही. सावरकरांविषयी राहुल गांधी यांचा स्वतःचा विचार आहे. सावरकर असं म्हणाले होते की, गाय आपली माता नाही. पण, भाजपाले माता आहे असं सांगतात. सावरकरांचे विचार ज्ञान देणारे आहेत. पण, भाजपा ते स्वीकारू शकते का? नाही,” असं भुजबळ म्हणाले.

उद्यापासून नागपूर येते हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमावर भाजपानं बहिष्कार टाकला आहे. सावरकरांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्यांसोबत चहा घेणार नाही, अशी भूमिका प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं घेतली आहे.