शिर्डी देवस्थानकडून ड्रेसकोडसंबंधी लावण्यात आलेल्या बोर्डविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तृप्ती देसाई पुणे येथून शिर्डीसाठी रवाना झाल्या आहेत. दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

“शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारणार,” असा इशारा तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे. दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले आहेत. सीमेवरच त्यांना रोखू असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे तृप्ती देसाई आणि ब्राह्मण महासंघ आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या नेमकं प्रकरण –
लॉकडाउनच्या काळात बंद असेलली मंदिरं पुन्हा एकदा खुली करण्यात आली असून ठिकठिकाणी दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत. शिर्डीमधील साई मंदिरही दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शिर्डीमध्ये फक्त राज्य नाही तर देश विदेशातून लोक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा असं आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.