शेकडो आदिवासींच्या हत्याकांडासह २० दलितांचे हत्याकांड करणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात २ जूनला दामरंचा येथे जय भीमची घोषणा देत भूमकाल संघटनेच्या वतीने दंडकारण्यात धिक्कार सभेच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

३० वर्षांत या जिल्ह्य़ात शोषित-पीडित जनतेच्या नावाने नक्षलवाद्यांनी दंडकारण्यात प्रवेश मिळविला. नक्षलवादी आज त्याच जनतेच्या भरवशावर शक्तीशाली झाले आणि आज अशी परिस्थिती आहे की, याच नक्षलवाद्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शेकडो आदिवासींची हत्या केली.

केवळ आदिवासीच नाही, तर आजवर त्यांनी २० दलितांच्या हत्या करून सर्वात मोठे दलित हत्याकांड घडवून आणले आहे. दलित समाज व जनता पुढे जाऊ नये, हा नक्षलवाद्यांचा विचार आहे. त्यासाठी ते अशा पध्दतीने आडकाठी निर्माण करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना न मानणारे नक्षलवादी दलित-आंबेडकरी जनतेच्या विरोधात आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी २० वर अधिक दलितांना मारून टाकले. कारण, हे लोक विकासासाठी प्रयत्न करीत होते. दामरंचा येथील पत्रू दुर्गे, चिंतलपेठा येथील तिरुपती दुर्गे, रमेश गुडम येथील येडाला पोचाम, छल्लेवाडा येथील बापू दुर्गे आणि बाकी दलित लोकांना का मारले? समाजासाठी काम करत होते म्हणून. बाबासाहेबांनी म्हटले शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, पण हे आम्हाला शिकू देत नाही. कारण, आम्ही संघटीत झालो तर नक्षलवाद्यांविरोधात संघर्ष करू आणि प्रगती करू. आजकाल तर त्यांची मुजोरी इतकी वाढली आहे की, यंदा छल्लेवाडा गावात बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमात गोळीबार केला. बाबासाहेब आमचे दैवत आहेत. त्यांचा जो अपमान करेल त्याला आम्ही कधीच माफ करणार नाही. आता आंबेडकरी समाज नक्षल्यांच्या बदमाशीला बळी पडणार नाही. आम्ही एकटे असलो तरी नक्षली आम्हाला मारू शकतात, पण हजारो आंबेडकरी एक झालो आणि बुध्दाच्या शांतीच्या मार्गाने पुढे निघालो तर नक्षलवादी पळून जातील. आम्ही घटना न मानणाऱ्या नक्षलवाद्यांच्या विरोधात आहोत. आमच्या गावात त्यांनी येऊ नये, असे आवाहन भूमकाल संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. दामरंचा गावात २ जूनला सकाळी १० वाजता ही धिक्कार सभा होत आहे. या सभेला जिल्हाभरातून लोकांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहून लोकशाहीवरचा विश्वास दाखवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.