भारत सरकारच्या नवी दिल्लीस्थित विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग संचालित राष्ट्रीय शोध संस्थेतर्फे अहमदाबाद येथे आयोजित  बाल वैज्ञानिक शोध स्पर्धेत येथील उस्मान हनिफ पटेल व मसिराबी हनिफ पटेल या भांवडांनी पुरस्कार पटकावला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत संपूर्ण देशातून तब्बल २०८०० बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता. अहमदाबाद येथील ओल्ड कॅम्पस ऑफ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत ही स्पर्धा झाली. भुसावळ येथील गंजाळ कॉलनीतील रहिवासी व ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणारा उस्मान पटेल आणि एम.आय. तेली शाळेत इयत्ता आठवीत शिकणारी त्याची मोठी बहीण मसिराबी पटेल यांनी आपले संशोधन सादर केले होते. या संशोधनामागील प्रेरणाही मोठी रोचक आहे. घराजवळ चारचाकी हातगाडीवाला उतारावरून जात असताना त्याची गाडी आणि तो दोघेही पडले. ते पाहून उस्मानने हातगाडीला चारचाकी वाहनांप्रमाणे ब्रेक आणि स्टेअरिंग बनविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तो आपल्या संशोधनात यशस्वी झाला. तर वडिलांसह मोटारसायकलवरून मसिरा जात असताना चारचाकी मोटारीतील लोकांना बंद काच असताना गरम कसे होत नाही, हा प्रश्न विचारून तिने वडिलांना भंडावून सोडले. त्यांनी तिला त्या गाडीत वातानुकूलित यंत्रणा असते असे सांगितले. त्यानंतर मसिराबी हिने मोटारसायकलस्वारालाही वातानुकूलित यंत्रणेचा कसा फायदा मिळेल यावर संशोधन केले. त्यानुसार तिने दुचाकीवर वातानुकूलित यंत्र बसविले. त्यातील हवा दुचाकीस्वाराच्या अंगावरील जॅकेटमधून खेळती राहील, या स्वरूपाचे प्रात्यक्षिक अहमदाबाद येथे सादर केले. बहीण-भावांच्या या संशोधनाला संपूर्ण देशातून आलेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक ३८ विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.