News Flash

वाहनाच्या धडकेने बिबटय़ाचा मृत्यू

दरम्यान, संगमनेर तालुक्यात यापूर्वीही अपघातात बिबटे मृत पावले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

शहराजवळ असणाऱ्या १३२ केव्ही वीज उपकेंद्राजवळ नाशिक—पुणे मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सतत वाहनांच्या अपघातात बिबटय़ांचा मृत्यू होत असल्याने प्राणीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

याबाबतची माहिती अशी की, संगमनेर शहराजवळ असणाऱ्या १३२ केव्ही वीज उपकेंद्राजवळ नाशिक—पुणे मार्गावर  बिबटय़ा रस्ता ओलांडून मार्गानजीक असणाऱ्या महादेव मंदिराकडे येत होता. याच दरम्यान, नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्याला जोराची धडक दिली. जोराची धडक बसल्याने अंदाजे एकवर्षीय मादी जातीचा बिबटय़ा जागीच गतप्राण झाला. या धडकेनंतर वाहनचालकाने वाहन न थांबविता सुसाटय़ाने निघून गेला. दरम्यान, याचवेळी येथून जाणाऱ्या संगमनेर शहरातील शुभम आसावा, महेश पडताणी, अभिजित कर्पे या युवकांनी रस्त्याच्या मध्येच पडून असलेल्या बिबटय़ाला बाजूला घेतले. त्यानंतर वन विभागाला कळविले. माहिती मिळताच संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल अंबादास मेहेत्रे, वनरक्षक संतोष पारधी, योगेश डोंगरे हे तत्काळ घटनास्थळी हजर झाले. बिबटय़ाच्या तोंडाला मार लागल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वनपाल मेहेत्रे यांनी माहिती देताना सांगितले. मृत बिबटय़ाला तालुक्यातील निंबाळे येथील नर्सरीत नेत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी या बिबटय़ावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, संगमनेर तालुक्यात यापूर्वीही अपघातात बिबटे मृत पावले आहे. एकीकडे ग्रामीण भागात शेतकरी बिबटय़ाच्या दहशतीमुळे आणि मुक्त संचारामुळे भयभीत झाले आहे. अनेक गावांत पिंजरा लावून बिबटय़ास जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केलेली आहे. तर दुसरीकडे वाहनचालकांच्या उतावीळपणात निष्पाप बिबटय़ांना प्राणास मुकावे लागले आहे. विशेष म्हणजे बिबटय़ांचा थेट शहराकडे संचार आणि वाहनचालकांचा निष्काळजीपणा या चिंतेच्या बाबी असून याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया प्राणिप्रेमींनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 2:14 am

Web Title: bibtayas death in a car accident akp 94
Next Stories
1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यवतमाळातून विधान परिषदेवर जाणार?
2 नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणा
3 कुत्र्यांनी पाठलाग केल्याने बिबटय़ाची घाबरगुंडी
Just Now!
X