महामार्गावरून जाणारा भरधाव कंटेनर थेट रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडींवर आल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये १० ते १५ लोक गंभीर जखमी झाले आहेत. लाखनी-भंडारा मार्गावर ही दुर्घटना घडली. घटनेनंतर कंटेनरचा चालक फरार झाला असून संतप्त लोकांनी कंटेनर पेटवून दिला.

सुत्रांच्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ग्रेस ल्यांड लॉन समोर उभ्या असलेल्या १५ ते २० लोकांना रायपूरच्या दिशने येणाऱ्या अनियंत्रित कंटेनरने चिरडले. ही धडक इतकी भीषण होती की, ७ लोकांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ लोकांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर जखमी वऱ्ह्याडींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर काही लोकांना लाखनी ग्रामीण रुग्णालयात उपचारांकरीता दाखल करण्यात आले आहे. १० जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

लाखनीतील जगनाडे कुटुंबियांच्याकडे  हे लग्न असून नागपुरातील हारगुडे कुटुंबीय वऱ्हाड घेऊन आले आले होते. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास लग्न लागले. त्यानंतर महामार्गालगतच्या हॉलमध्ये गर्दी झाल्याने काही वऱ्हाडी हॉल बाहेर थांबले. दरम्यान, रायपुरच्या दिशेने येणारा एक भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट या लोकांच्या अंगावर आला.

या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा  रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला असून आणखी १० ते १५ लोकांची प्रकृती चिंताजन आहे.