जिल्ह्यामध्ये करोनाचा उद्रेक वाढतच आहे. त्यातच करोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठा घोळ असल्याचा प्रकार समोर आला. शासकीय वैद्यकीय महाविद्याालयाकडून देण्यात आलेल्या प्रत्यक्षातील एकूण करोनाबाधित, मृत्यू व अॅक्टिव्ह रुग्ण संख्या व जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत असल्याचे आढळून आले. तब्बल २९ मृत्यू कमी दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.

अकोला जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्यावरही करोना संसर्गावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. बाजारपेठांमध्ये बेफिकीर नागरिकांची मोठी गर्दी उसळतच आहे. जिल्ह्यात करोनाचा वाढता उद्रेक व शासकीय वैद्याकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या समस्येवर भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाकडून करोनाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या संख्या व वैद्यकीय महाविद्यालयाकडून ४ एप्रिलपर्यंत देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासनाने रविवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २८ हजार ८३१ असल्याचे जाहीर केले होते, तर आजच्या बैठकीमध्ये जिल्ह्यात एकूण ३० हजार ६५३ बाधित आढळून आले असून त्यात ११ हजार ५०२ रुग्ण ग्रामीण भागातील असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येमध्ये १ हजार ८२२ चा फरक आहे. जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत एकूण २४ हजार ०२५ रुग्णांना सुटी देण्यात आल्याचे सांगितले, तर जीएमसीच्या अहवालानुसार आतापर्यंत २६ हजार २७५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या एकूण मृत्यूमध्ये तर फार मोठे अंतर आढळून येते. जीएमसीने दिलेल्या माहितीनुसार शहरी भागातील २९६ व ग्रामीण भागातील २०३ असे एकूण ४९९ मृत्यू झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या रविवारपर्यंतच्या अहवालात एकूण मृत्यू ४७० दाखवण्यात आले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्येचा घोळ तर कायमच आहे. जीएमसीने शहरी भागातील २ हजार ५४२, तर ग्रामीण भागात १३३७ असे एकूण ३ हजार ८७९ सक्रिय रुग्ण संख्या असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाने रविवारपर्यंत ४ हजार ३३६ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे म्हटले. केंद्र शासनाच्या करोना ‘पोर्टल’शी वैद्यकीय महाविद्यालयाची आकडेवारी जुळत आहे. करोनाबाधितांच्या आकडेवारीत प्रचंड गोंधळ असून प्रशासनात समन्वय नसल्याचे स्पष्ट होते.

७८ टक्के रुग्ण गृहविलगीकरणात

जिल्ह्यातील ७८ टक्के करोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. शहरी भागात गृहविलगीकरणात २ हजार ०५०, कोविड केंद्रात ८० व रुग्णालयात दाखल ४१२ रुग्ण आहेत. ग्रामीण भागात ९७२ गृहविलगीकरणात, कोविड केंद्रात ७९ व रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या २८६ आहे.

आकडेवारी अद्ययावत करण्यात येईल – जिल्हाधिकारी

सर्व ठिकाणची माहिती एकत्रित करून त्याची जुळवाजुळव व अद्ययावत करण्यासाठी थोडा वेळ लागतो. ‘पोर्टल’वरील माहितीनुसार करोनाबाधितांची आकडेवारी अद्ययावत करण्यात येईल. असे अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.

‘पोर्टल’वरील माहिती खरी आहे –  आरोग्य उपसंचालक

करोनाबाधितांची ‘पोर्टल’वरील माहिती खरी आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्याालयाने बैठकीत माहिती सादर केली. जिल्हास्तरावरील माहिती अद्ययावत केली जाईल. असे  आरोग्य उपसंचालक डॉ.राजकुमार चव्हाण यांनी सांगितले आहे.