ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी परळीतील गोपीनाथगडावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. मुंडेंच्या नावाचा जयघोष करीत राज्यभरातून कार्यकत्रे िदडय़ा घेऊन गोपीनाथगडावर आल्याने जनसागरच निर्माण झाला.
मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात उभारल्या जात असलेल्या गोपीनाथगडावर मठाधिपती नामदेवशास्त्री महाराजांचे कीर्तन झाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रज्ञा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, अॅड. यशश्री मुंडे यांच्यासह उद्योगमंत्री प्रकाश मेहता, गृहराज्यमंत्री राम िशदे, आमदार विनायक मेटे व अतुल सावे, भगवानगडाचे सचिव गोिवद घोळवे यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नामदेव शास्त्री यांनी कीर्तनातून गोपीनाथ मुंडे यांचा जीवनपट उलगडून दाखवत पंकजा मुंडेंना पाठबळ देण्याचे आवाहन केले. केशवमहाराज उपळीकर यांनीही कार्यकत्रे घडविणारे मुंडे हे विद्यापीठ होते, अशी भावना व्यक्त केली.
पंकजा मुंडे यांनी या वेळी बोलताना गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारण, समाजकारणाचा वारसा चालवणे सोपे काम नाही. जनसामान्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपणावर असून ती पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करेन, अशी ग्वाही दिली. गोपीनाथ मुंडे नावाचा झेंडा सदैव डौलत राहील व तसूभरही खाली येऊ देणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गोपीनाथ गडावर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकत्रे मुंडेंच्या नावाचा जयघोष करीत मोठय़ा संख्येने जमले. टाळ-मृदुंगाच्या गजरात िदडय़ांनी गडाचा परिसर गजबजून गेला. अनेकांना आठवणींनी गहिवरून आले.