पिंपरी चिंचवड येथील चिखली या भागात असलेल्या शेलारमळा भागात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एका केमिकल कंपनीला आग लागली. थिनरच्या ड्रमचा स्फोट झाल्याने ही आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली आणि तिथे लागणारी आग हे काही वर्षांपासून एक समीकरणच झाले आहे. या ठिकाणी बऱ्याचदा आगीच्या घटना घडतात. भंगार दुकाने आणि इतर कंपन्यांची इथे गर्दी झाली आहे. शेलारमळा भागातील केमिकल कंपनीला आग लागताच पिंपरी, पुणे, बजाज या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. रविवार असल्याने या आगीत कोणीतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. आग लागली तेव्हा कंपनीत थिनरचे २०० लीटरचे २५ ड्रम होते. २५ पैकी ३ ड्रमचा स्फोट झाला आणि मग इतर ड्रम्सनी पेट घेतला.