भिवंडी-वाडा या राज्य महामार्गावर वाडय़ाजवळ वैतरणा नदीवर नव्याने बांधलेल्या पुलास मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करून शेजारील जुन्या पुलावरून वाहतूक वळविण्यात आली आहे.
 भिवंडी-वाडा या राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर केले आहे. रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असूनही गेल्या सहा महिन्यांपासून येथे दोन ठिकाणी नाके उभारून कंपनीने टोलवसुली सुरू केली आहे.
पूल कार्यान्वित होऊन अद्याप वर्षही पूर्ण झालेले नाही. तेवढय़ात त्यावर पडलेले हे तिसरे भगदाड सर्वात मोठे आहे. त्यामुळे आता किमान महिनाभर या पुलावरील वाहतूक बंद राहणार आहे.
विशेष म्हणजे या नव्या पुलालगतच शंभर वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल असून, त्यावर शतकानंतरही एकही भगदाड पडलेले नाही.