News Flash

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट

राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली माहिती

राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओके या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे. “माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” असं फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

शरद पवारांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी देखील पवारांची भेट घेतली असल्याचं एक कारण सांगितलं जात आहे. याशिवाय राज्यात सध्या मराठा आरक्षण व अनेक महत्वाचे मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने याबाबतही या भेटीत चर्चा झाली असावी असंही बोललं जात आहे.

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रात ओबीसीसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेलं नाही, असं सांगत फडणवीस यांनी आरक्षण कशाप्रकारे घालवलं हे समोर ठेवायचं असल्याचं सांगितलं. आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 1:43 pm

Web Title: big news devendra fadnavis met sharad pawar msr 87
Next Stories
1 केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत; रोहित पवारांचे चंद्रकात पाटलांना उत्तर
2 ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत बसले; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर प्रहार
3 पेट्रोलने गाठली शंभरी; पुणेकरांचं पाकीट होणार अशक्त
Just Now!
X