वेकोलिचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सिकलसेल हॉस्पिटल, प्लास्टिक इंजिनिअरिंग व कोळशावर आधारित युरिया निर्मितीचा कारखाना हे चार मोठे प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्य़ात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्यानंतर तब्बल २० वर्षांने चंद्रपूर जिल्ह्य़ाला हंसराज अहीर यांच्या रूपाने केंद्रात खते व रसायन राज्यमंत्रीपद मिळाले आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेतांना अहीर यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ात मोठे प्रकल्प यावे, यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात वेकोलिचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सिकलसेल हॉस्पिटल, प्लास्टिक इंजिनिअरिंग व कोळशावर आधारीत युरिया निर्मितीचा कारखाना या चार मोठय़ा प्रकल्पांना मंजुरी मिळविण्यात त्यांना यश आले आहे. ताडाळी एमआयडीसी परिसरात होणारे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अतिशय अद्यावत राहणार असून वेकोलि अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून तर या परिसरातील सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील रुग्णांवर निम्म्या दरात उपचार केले जाणार आहेत. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवरच हे हॉस्पिटल राहणार असून वेकोलि कोटय़वधी रुपये खर्च करून या हॉस्पिटलची इमारत उभी करणार आहे.
या जिल्ह्य़ातील सिकलसेलचा गंभीर प्रश्न लक्षात घेता दाताळा म्हाडा कॉलनी परिसरात सुपर स्पेशालिटी सिकलसेल हॉस्पिटल उभारण्यात येणार असून त्यालाही केंद्र सरकारने परवानगी दिली असून २५ ऑक्टोबरपासून सुरक्षा भिंतीचे काम सुरू होत असल्याची माहिती हंसराज अहीर यांनी दिली. हे हॉस्पिटल आपले आयुष्यातील स्वप्न असून ते साकार होत असल्याचे बघून अतिशय आनंद होत आहे, असेही ते म्हणाले. या भागातील बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांसाठी प्लास्टिक इंजिनिअरिंग कॉलेज लवकरच सुरू होणार आहे. चंद्रपूर वेकोलि परिसरात त्यासाठी नुकतीच जागा मिळाली आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंगचे केंद्र महाराष्ट्रात सध्या केवळ औरंगाबादलाच आहे. देशात २६ केंद्रे सुरू असून चंद्रपूरचे केंद्र २७ वे राहणार आहे. दरम्यान, या वष्रेभरात देशभरात ४० केंद्रे सुरू करण्यात येणार असून तसे नियोजन केंद्र सरकारव्दारा करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असे प्रत्येक विभागवार प्लास्टिक अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याचा केंद्राचा मनोदय असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोळशावर आधारित युरिया कारखाना चंद्रपूर व मुंबईत होणार आहे. चीनने हे तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिल्यामुळे जर्मनीकडून ते खरेदीचा विचार सुरू आहे. मात्र, जर्मनीचे तंत्रज्ञान महागडी असून त्यापासून तयार होणार युरिया भारतीय शेतकऱ्यांना परवडणार नाही. हे लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञानाची जुळवा जुळव सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच चंद्रपूर वीज केंद्रात कोल वॉशरीचा प्रस्ताव कोल इंडियाला पाठविण्यात आलेला आहे. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीखाली कोटय़वधीचा कोळसा असल्याने वेकोलिने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. मात्र, कोल इंडिया परवानगी देईल, असा विश्वास अहीर यांनी व्यक्त केला. वीज केंद्र व स्थानिक उद्योगांकडून सुरू असलेले प्रदूषण हा गंभीर विषय आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ व वीज केंद्राचे अधिकारी याकडे पुरते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आज वीज केंद्र व वेकोलिकडे मुबलक कोळसा उपलब्ध आहे. विदेशी कोळसाही आयात केला जात आहे. वेकोलिचे उत्पन्न ९ टक्क्यांनी वाढले आहे. या सर्व जमेच्या बाजू असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ व वीज केंद्राचे अधिकारी सुस्तावले असल्याचा आरोपही अहीर यांनी केला. चंद्रपूरहून मुंबईला जाण्यासाठी लवकरच दोन रेल्वे गाडय़ा सुरू होत आहे. जाणारी गाडी ही वणी मार्गे, तर येणारी गाडी वर्धा मार्गे येईल, असेही ते म्हणाले.