महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले अनेक पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. राज्यात सत्तेत असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढवत आहे. मात्र, महाराष्ट्रात एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना बिहार निवडणूक एकत्र लढणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला.

बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होणार असून, राजकीय प्रचारालाही सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असलेले प्रादेशिक पक्षानीही बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम हे पक्ष विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

शिवसेनाही बिहार विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना बिहारमध्ये एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.

या चर्चेसंदर्भात बोलताना शिवसेनेचे नेते, मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले,”शिवसेना ४० ते ५० जागा लढवणार आहे. आतापर्यंत युती करण्यासंदर्भात कुणाशीही चर्चा झालेली नाही. पुढील आठवड्यात मी पाटणाला जाणार आहे. पप्पू यादव यांच्यासह काही स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढू इच्छित आहे. त्यांची चर्चा करण्याची इच्छा आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना व राष्ट्रवादीनं निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यापासून दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून या चर्चेनं जोर पकडला आहे. शिवसेनेनं निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली होती. मात्र, पांडे यांना तिकीटच देण्यात आलेलं नाही.