देशाचं लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडं लागलं आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून, निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. जाहीरनाम्यातून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात असून, भाजपानं दिलेल्या आश्वासनावरून देशभरात गदारोळ सुरू झाला आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर बाण रोखत सवाल उपस्थित केला आहे.

सध्या देशाचं लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडं लागलं आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून, टीकांची चिखलफेक जोरात सुरू आहे. त्यातच भाजपानं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. भाजपानं करोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. याच मुद्यावरून भाजपावर टीकेची राळ उठली असून, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

“जिथे जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथे करोनाची लस मिळणार नाही का?, हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे, भाजपाध्यक्ष नड्डा, डॉ. हर्ष वर्धन देशाच्या पंतप्रधानांनी. मोदींचं भाषण ऐकलं, त्यात घराघरापर्यंत लस कशी पोहोचेलं याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं आहे. जिथे भाजपाचं सरकार असेल, जिथे भाजपालाच मतदान केलं जाईल, त्यांनाच लस मिळेल हा संशोधनाचा विषय आहे. जेव्हा शाळेत जायचो तेव्हा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा, अशी घोषणा होती. मात्र, आता तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सीन देंगे, अशी घोषणा दिली जात आहे. म्हणजे जे मत देणार त्यांनाच लस देणार, ही क्रूरता आहे. निर्घृणता आहे. बिहारमध्ये दुसऱ्या पक्षाला मत दिलं, तर त्यांना लस मिळणार नाही. मध्य प्रदेशातही हेच बोलल जात आहे. मग आता देशाची विभागणी करण्याची तयारी सुरू आहे का?, आधी जाती धर्मावरून विभागणी करत होतो. आता लशीवरून हे केलं जातंय. हे चांगलं नाही,” असं राऊत म्हणाले.

“नोकऱ्याचं आश्वासन समजू शकतो. अन्न, वस्त्र, निवारा हे समजू शकतो. आमचा आक्षेप लशीच्या मुद्याला आहे. लशीचा मुद्दा राजकारणासाठी आणि निवडणुकीसाठी वापरण्यात आला आहे. यामुळे पंतप्रधान मोदींची बदनामी होत आहे. मला हे वाटतंय, मोदीजींच्या प्रतिमेला ठेच पोहोवणारे वक्तव्य आहे,” असं राऊत म्हणाले.