News Flash

दुचाकी विक्रीत मंदीमुळे घट

ऐन सणासुदीच्या दिवसात पालघरमधील व्यावसायिकांवर संक्रांत

दुचाकी विक्रीत मंदीमुळे घट
(संग्रहित छायाचित्र)

निखिल मेस्त्री

पालघरमध्ये दुचाकी वाहन विक्री व्यवसायाला घरघर लागली आहे. व्यवसायावर येथे मंदीचे सावट पसरल्याचे दिसून येत आहे. बाजारामध्ये आलेल्या मंदीमुळे ऐन सणासुदीच्या दिवसात पालघरमधील दुचाकी वाहन विक्री व्यवसायावर संक्रांत ओढवल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर शहरासह बोईसर, डहाणू, वाडा, विक्रमगड, तलासरी आदी ठिकाणी अनेक दुचाकी वाहन विक्रेत्यांची आलिशान दुकाने आहेत. महिन्याकाठी गतवर्षी सुमारे १५० ते १७० दुचाकी विकल्या जात होत्या. मात्र यंदा दुचाकींच्या विक्रीचे प्रमाण कमी आहे.  महिन्याकाठी ४० ते ५० दुचाकींची विक्री होत आहे. तुलनेत ४० ते ५० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

मंदीचे सावट जरी असले तरी रोज बदलती शासनाची धोरणे यामुळेसुद्धा व्यवसायाला खीळ बसली आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मोटर परिवहन विभागाचे वाहन शुल्क सात टक्क्य़ांहून थेट ११ टक्क्य़ांपर्यंत अचानकपणे वाढविल्याचा परिणामही विक्रीवर झाला आहे.

दुचाकी घेतल्यानंतर असलेला विमा हा पाच वर्षांपर्यंतचा केला गेल्याने त्यापोटी सुमारे पाच हजारांहून अधिकचे शुल्क भरण्यास ग्राहक तयार नाहीत. शासनाची काही चुकीची धोरणे यामुळे याआधीच विक्री व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. वाहनांवरील व त्याच्या सुटय़ा भागावरील वाढलेली जीएसटी, बीएस-३ नंतर झालेला परिणाम, शासनाचे वाढलेले शुल्क आदीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या.  दुचाकी ग्राहकांना आकर्षित व्हावे यासाठी विक्रेते वेगवेगळ्या आकर्षक योजना अवलंबत असले. तरीही ग्राहक दुचाकी घेण्यासाठी येत नसल्याची अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. दिवसेंदिवस कमी होत जाणारी वाहनविक्री ही या व्यावसायिकांची डोकेदुखी ठरू लागले आहे. विक्री होत नसल्याने भाडय़ाचे शोरूम, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल दुरुस्ती असे अनेक खर्च या व्यावसायिकांना पेलवेनासे झाले आहे. यातून काही विक्रेत्यांनी हा व्यवसाय बंद करावा आणि दुसरे काहीतरी सुरू करावे असे वाटत असल्याचे सांगितले.

वर्षभरापूर्वी दुचाकी विक्रीतून कोटय़वधीचा महसूल शासनाला देणारे हे विक्रेते आज हतबल झालेले आहेत. याचा परिणाम थेट रोजगारावर येत असून वाहन विक्री होत नसल्यामुळे मनुष्यबळ कपात करण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे.

२०१७ च्या तुलनेत आठ हजारांनी घसरणी

उपलब्ध माहितीनुसार १६ एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत वसई प्रादेशिक मोटार परिवहन कार्यालयांतर्गत जिल्ह्य़ातील ६९ हजार ८६५ दुचाकी वाहन नोंदणी म्हणजेच विक्री केल्या गेल्या आहेत. हीच आकडेवारी २०१८ पर्यंत ६१ हजार २७४ हजार दुचाकी आहेत. मार्च २०१९ पर्यंतची याच कार्यालयांतर्गत दुचाकी नोंदणी झालेली वाहने ६२ हजार १५८ इतकी आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये वाहन नोंदणी सुमारे आठ हजारांनी घसरली आहे.

एक वर्षांच्या विम्याऐवजी पाच वर्षांचा विमा घेण्याचा नियम, शासनाने वाढवलेले कर, कायम निवास पत्ता नसलेल्या ग्राहकाच्या दुचाकी नोंदणी करण्यासाठी लादलेल्या जाचक अटी या सर्वाचा एकत्रित परिणाम वाहन विक्रीवर झालेला आहे. सुमारे पंधरा ते वीस टक्क्य़ाने मागणी घटलेली आहे.

– धनंजय संखे, एस. टी. एस. होंडा

बाजार मंदीमुळे वाहन विक्री मंदावली आहे. खर्च झेपत नाही. मनुष्यबळ कपात करण्याची वेळ आली आहे. याकडे विशेष लक्ष देऊन जीएसटी कमी करायला हवे. वाहनविक्रीला वेग येण्यासाठी शासनासह वाहन पुरविणाऱ्या कंपन्यांनी उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

-आसिफ धनानी, धनानी मोटर्स

दुचाकी विक्रीत घट झाल्याने खर्च परवडत नाही. वाहनविक्री अध्र्यावर येऊन ठेपली आहे. खर्च भागवायचा कसा हा प्रश्न असून शोरूमध्ये दुचाकी तशाच उभ्या आहेत.  नवनवीन गाडय़ा बाजारात दाखल होत असताना नवीन असलेल्या मात्र जुन्या गाडय़ा विकायच्या कशा हा प्रश्न आहे. आताच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

-वृषाली ठाकूर, नॅशनल मोटर्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 12:22 am

Web Title: bike sales slowdown abn 97
Next Stories
1 स्वच्छता मोहिमेनंतर भुईगाव किनाऱ्यावर अस्वच्छता
2 उदयनराजेंना कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत बांधता येणार नाही – शिवेंद्रसिंहराजे भोसले
3 चंद्रपूर – बुद्ध टेकडीवरील पुरातन बुद्धाची मूर्ती चोरी, मूल शहरात तणाव; पोलिसांचा चोख बंदोबस्त
Just Now!
X