विविध भाषा अवगत असलेल्या आणि जनमानसावर स्वत:चा प्रभाव टाकणाऱ्या एका तरुणाला पुण्यातून मोटारसायकल चोरून सोलापुरात आणल्याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. राजेश ऊर्फ तेजराज पिल्ले (वय २२, रा. वडार गल्ली, बुधवार पेठ, सोलापूर) असे त्याचे नाव आहे.
संशयित पिल्ले हा पुण्यात ससून सवरेपचार  रुग्णालयाच्या परिसरात वावरत असे. एखादी मोटारसायकल दोन-तीन दिवस त्याच ठिकाणी पडून राहिल्याचे दिसल्यास त्यावर लक्ष ठेवून अशा मोटारसायकली चोरून नेण्याचे काम पिल्ले करीत असे. त्याने चोरलेल्या बहुतांश मोटारसायकली ससून रुग्णालयातील डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांच्या असाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे.
शहरातील वडार गल्लीत राहणारे सूरज गवळी यांची मोटारसायकल गेल्या १ जुलै रोजी विजापूर रस्त्यावरील नवीन उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून चोरीला गेली होती. त्याबाबत गवळी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्याचा तपास करीत असताना संशयित म्हणून राजेश पिल्ले यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीच्या सहा मोटारसायकली आढळून आल्या. गवळी यांची मोटारसायकलही त्यानेच चोरून नेली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू जाधव, अनिल पोरे, राजकुमार श्रीमान, श्रीरंग कुलकर्णी, औदुंबर पाडुळे, सतीश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.