उपचारांची माहिती लपविल्याचा करोनाबळीच्या कुटुंबीयांचा आरोप

विरार : नालासोपारा मधील एका करोनाग्रस्त रुग्णावरील उपचाराचे तब्बल ९ लाख ६१ हजार रुपयांचे बिल खोसाी रुग्णालयाने थोपवले आहे. हा रुग्ण दगावला असून रुग्णालयाने उपचाराची माहिती लपवून पैसे उकळल्याचा आरोप मयत रुग्णाच्या मुलाने केला आहे. रुग्णालयाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार नालासोपारा येथे राहणारे विजय कुमार गुप्ता (५५)  यांना ७ मी रोजी श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना नालासोपारा येथील रिद्धीविनायक रुग्णालयात दखल करण्यात आले होते. तीन दिवसांनी त्यांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तर विजय कुमार यांच्यावर पुढील उपचार सुरू केले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

उपचार सुरू असताना ९ मे रोजी त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. त्यातही सुधारणा येत नसल्याने त्यांना एक्मो मशीनवर ठेवण्यात आले. पण त्यांचा १९ मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयाने त्याच्या कुटुंबीयांच्या हाती ९ लाख ६१ हजार रुपयांचे बिल ठेवल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

बिलाच्या रकमते एक्मो मशीनचे ५ लाख २० हजार रुपये, अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रण आणि इतर खर्च यांचे १ लाख एक हजार ९५०, औषधे आणि वैद्य्कीय साहित्य, तपासणी आदींचा समावेश आहे

उपचारांआधी आम्हाला केवळ जुजबी माहिती देण्यात आली. तसेच उपचाराची माहिती देण्यास सतत टाळाटाळ करण्यात आली. कोणती औषधे वापरली आणि खरोखर मशीन लावल्या की नाही याची आम्हाला कोणतीही माहिती नाही यामुळे आमची रुग्णालयाने फसवणूक केली आहे, असा आरोप मृताचा मुलगा नीरज गुप्ता यांनी केला आहे. वडिलांच्या मृत्यू नंतर आम्हाला त्यांना पाहतासुद्धा आले नाही.  यामुळे जे आमच्या बरोबर झाले ते इतर कुणाबरोबर होऊ नये यासाठी रुग्णालयाची तपसणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘वेळोवेळी माहिती दिली जात होती’

रिद्धीविनायक रुग्णालयाने सर्व आरोप खोडून काढले आहेत. रुग्णालयाच्या संचालक  मंडळातील डॉ. एस. के. शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही उपचार करत असताना सर्व माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देत होतो. त्यांनी होकार दिल्या नंतरच आम्ही उपचार केले आहेत. आता केवळ रुग्णालयाची बदनामी केली जात आहे. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.