पालघर जिल्ह्यातील सुक्या मासळीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटी डहाणूसह उच्छेळी, दांडी, माहीम, केळवा, एडवण, दातिवरे इत्यादी गावांतील मच्छीमारांचे अवकाळी पावसामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
धाकटी डहाणू या ठिकाणी बोंबील, सोडे, मांदेळी, करंदी मासे सुकवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात व्यवस्था केली जाते. ही सुकी मासळी दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत सुकविण्यात येते. त्यानंतर त्याची विक्री पावसाळ्यापर्यंत अनेक ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारांमध्ये केली जाते. सद्य:स्थितीत सुक्या बोंबलाला २०० रुपये, मांदेली १५० रुपये, तर सुकट शंभर रुपये किलोला विकली जाते. यंदाच्या हंगामामध्ये मोठय़ा प्रमाणात बोंबील उपलब्ध झाल्याने सुकवण्यासाठी टाकण्यात आले होते. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे सुकत टाकलेली ही मासळी खराब झाली. ती फेकून द्यायची वेळ येथील मच्छीमारांवर आली आहे. सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. तर जिल्ह्य़ातील सुक्या मासळीचा विचार करता हे नुकसान सुमारे पाच कोटींपर्यंत असेल असा प्राथमिक अंदाज मच्छीमारांकडून वर्तविण्यात येतो.
दरम्यान, सुक्या मासळीच्या व्यवसायात संपूर्ण कुटुंब कामात गुंतलेले असते. घरातील महिला वानेरीला बोंबील टांगण्याचे काम करतात. त्यामध्ये मासळी सुकवण्याच्या कामात मोठे श्रम घ्यावे लागतात, पण पावसामुळे मासळी नासली, त्यामुळे हे सर्व श्रम वाया गेले आहेत, असे सांगत जयश्री धानमेहेर या मच्छीमार महिलेने खंत व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने नक्कीच गांभीर्याने लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे देशाला कोटय़वधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या मच्छीमारांच्या प्रश्नाकडेसुद्धा तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
– वशीदास अंभिरे, मच्छीमार नेते, डहाणू
अवकाळी पावसामुळे मच्छीमारांच्या सुक्या मासळीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईप्रमाणेच मच्छीमारांनाही शासनाने नुकसानभरपाई द्यावी.
– जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमारी संघ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 12:22 am