नांदेड : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून नांदेड आणि भोकरसह जिल्ह्याच्या अन्य भागांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाली असली, तरी १९७८ साली शंकरराव चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करणारे समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे नाव असणाऱ्या देगलूरमधील सभागृहाचा जीर्णोद्धार शंकररावांचे पुत्र व मंत्री अशोक चव्हाण यांच्या राजवटीत रखडला आहे. सध्या या सभागृहाची मोठी दुरवस्था झालेली आहे.

देगलूर शहराच्या एका प्रवेशस्थळालगत असलेल्या नगर परिषदेच्या विस्तीर्ण जागेत ९० च्या दशकात बांधण्यात आलेल्या भव्य सभागृहाला तत्कालीन कारभा?ऱ्यांनी साथी एस. एम. जोशी यांचे नाव दिले होते; पण नंतरच्या काळात सभागृहाची दैना झाली. सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांऐवजी तेथे विवाह सोहळे पार पडू लागले. पुढे दुरवस्था झाल्याने या सभागृहाचा वापर थांबला. १९९९ ते २०१४ या काळात राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत होते; पण देगलूरच्या एस. एम. जोशी सभागृहाच्या नूतनीकरणाची बाब कोणीही मनावर घेतली नाही. १९७८ साली शंकरराव चव्हाण महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसचे आमदार असताना त्यांच्या अनुभवाचा विचार करून एसेम यांनीच त्यांना पुलोद मंत्रिमंडळात आणले आणि तेथून शंकररावांनी नव्याने राजकीय भरारी घेतली. आता शंकररावांचे पुत्र राज्याचे बांधकाममंत्री असून मागील सरकारने याच खात्याकडे निधी दिली आहे. तरीही  एस. एम. जोशी सभागृहाच्या नव्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. येथे मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या राजवटीत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी देगलूरवासीय कार्यकत्र्यांच्या मागणीनुसार एस. एम. जोशी सभागृहाच्या नूतनीकरणासह सुसज्जतेसाठी तीन कोटी रुपये दिले होते. ही रक्कम बांधकाम खात्याच्या देगलूर विभागाकडे ३ वर्षांपासून जमा आहे. आता त्यात सुधारित अंदाजपत्रकाचा घाट घालण्यात आला असून ते १५ कोटींवर गेले आहे.

विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांनी गेल्या महिन्यात आपल्या खात्यामार्फत विविध कामांच्या भूमिपूजनांचा सप्?ताह साजरा केला. नांदेड, भोकर, धर्माबाद, उमरी इत्यादी ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चाच्या कामांचा बार उडवून देण्यात आला. देगलूर नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. एस. एम. जोशी सभागृह पालिकेच्या मालमत्तेत समाविष्ट असले, तरी त्याच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या वाढीव रकमेचा विषय अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यासाठी नगरविकास विभागाकडे ‘हात’ पसरावे लागणार आहेत.

एस. एम. जोशी सभागृहाची सध्याची वास्तू पूर्णत: पाडावी लागणार असून तेथे नवीन सभागृह बांधावे लागेल. त्याशिवाय त्या परिसरात सुसज्ज व्यापारी संकुलाचे काम प्रस्तावित असून पूर्वीचा निधी नगरविकास विभागाकडून आलेला होता. वाढीव निधीसाठी त्याच विभागाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.  – अविनाश धोंडगे, अधीक्षक अभियंता