News Flash

मृगातील पहिल्याच पावसाने नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

तालुक्यातील देवळा येथील पुलावरून पाणी गेल्याने उमरी, पारगाव, जीवनापूर या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता.

माजलगाव तालुक्यातील देवळा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

बीड : मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या जोरदार पावसाने नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवारनंतर रविवारी झालेल्या पावसाने रस्त्याची अर्धवट कामे वाहून गेली, झाडे उन्मळून पडली. शहरांमधील बहुतांश भागात पाणी साचले असून नाल्यांमधील पाणी रस्त्यांवरून वाहू लागल्याने पूर्वमोसमी कामे केल्याचा पालिकांचा दावाही पावसामुळे खोटा असल्याचे स्पष्ट झाले. पावसामुळे शेतकरीवर्ग मात्र आनंदून गेला आहे.

जिल्ह्य़ात शनिवारनंतर रविवार पहाटेही ठिकठिकाणी जोराचा पाऊस झाला. बीड शहराजवळील बिंदुसरा नदीला पाणी आल्याने नदी, नाले वाहू लागले. वडवणी परिसरात कवडगाव, देवडी, खळवट लिंमगाव भागातील नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडेही उन्मळून पडली. धारूर तालुक्यातील आमला निमला परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. या भागातही झाडे उन्मळून घरावर पडली. बीडसह केज, अंबाजोगाई, धारुर, वडवणी, माजलगाव, गेवराई या भागातही पावसाने हजेरी लावली असली. मात्र, आष्टी, पाटोदा, शिरूर, परळी हे तालुके अद्याप कोरडेठाक आहेत.

माजलगाव तालुक्यात रविवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील देवळा येथील पुलावरून पाणी गेल्याने उमरी, पारगाव, जीवनापूर या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. तर लोणगाव येथील ओढय़ाला पुर आल्याने ती गावेही संपर्काबाहेर गेली होती. पात्रुड येथे दीड वर्षांपासून पुलाचे काम सुरू असून वाहतुकीसाठी पर्यायी पूल तयार केला होता. मात्र जोरदार पावसामुळे तो पूल खचल्याने बेलुरा, आनंदगाव, आलापूर, नाकलगाव, भगवाननगर, महादेव वस्ती या गावांचा माजलगावशी संपर्क तुटला होता. पहिल्याच पावसात ठिकठिकाणी नुकसान झाले असले तरी शेतकरी वर्ग मात्र आनंदून गेला आहे. रविवारी सकाळपासूनच बीडच्या मोंढा परिसरात शेतक ऱ्यांनी बी—बियाणे आणि खते खरेदीसाठी गर्दी केली होती.

 

‘येडेश्वरी’ची ५१ हजार क्विंटल साखर भिजली

केज तालुक्यातील आनंदगाव येथील येडेश्वरी खासगी साखर कारखाना परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. कारखान्याच्या गोदामात पाणी शिरल्याने ५१ हजार क्विंटल साखर भिजून नुकसान झाले. या वर्षी कारखान्याने ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून साखरेचे उत्पादन केले होते. मात्र पावसाने साखर भिजल्यामुहे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 1:51 am

Web Title: bindusara river overflow flood to bindusara river bindusara river in beed
Next Stories
1 करोनाच्या दुसऱ्या लाटेत अमरावती विभागात ३४१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
2  ‘हनी ट्रॅप’मध्ये तरुण, तरुणींना अडकवून ‘ब्लॅकमेलिंग’
3 ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर करोनाच्या सातपट
Just Now!
X