24 February 2021

News Flash

साखर कारखान्यांतून आता जैव सीएनजी उत्पादन

साधारणत: एक लाख टन मळीपासून चार हजार टन सीएनजी तयार होऊ शकतो.

 

|| सुहास सरदेशमुख

इथेनॉल उत्पादनातही एक पाऊल पुढे; वर्षभरात ७९ कोटी लिटर क्षमतावाढ

औरंगाबाद : राज्यातील १२५ साखर कारखान्यांतून इथेनॉल उत्पादनाचे प्रमाण १०१ कोटी लिटरपर्यंत पोहोचविण्यापर्यंतची क्षमता विकसित झाली आहे. येत्या काळात साखर कारखान्यांतून जैव सीएनजी उत्पादनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

साधारणत: एक लाख टन मळीपासून चार हजार टन सीएनजी तयार होऊ शकतो. मळीमिश्रित पाण्यापासून तसेच जैव पदार्थापासून तयार केलेल्या सीएनजी प्रकल्पाची पाहणी करून पुढील वर्षांत किती प्रकल्प उभे करायचे, याचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी हरियाणातील रोहतक येथे जैव पदार्थापासून उत्पादन करण्यात येणाऱ्या सीएनजी प्रकल्पास राष्ट्रीय साखर संघाचे प्रतिनिधी भेट देणार आहेत. येत्या काळात साखरेच्या मळीपासून तसेच मळीयुक्त पाण्यातून होणाऱ्या या प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रोत्साहन देत असल्याने पुढील वर्षात इथेनॉलप्रमाणेच या क्षेत्रातही महाराष्ट्राचे पाऊल पुढे असेल, असा दावा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केला.

साखरेचा दर आणि उसाचे भाव याचे गणित जुळत नसल्याने साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यावर उपाय म्हणून ३० लाख टन साखर कमी व्हावी आणि त्यातून इथेनॉल आणि जैव सीएनजी तयार करण्याचे  प्रकल्प व्हावेत असे प्रयत्न सुरू झाले आहेत. साखरेच्या या हंगामात इथेनॉलनिर्मितीलाही मोठा वेग देण्यात आला. राज्यात १२५  कारखान्यांमधून या वर्षात २००.२४ कोटी लिटर एवढी इथेनॉलनिर्मितीची क्षमता होती. त्यात आता ७९.२० कोटी लिटरची वाढ झाली आहे. आता राज्यातील साखर कारखाने ३६०.८९ कोटी इथेनॉलनिर्मिती करतात.

उसाच्या रसापासून साखर तयार न करता थेट इथेनॉल करणाऱ्या कारखान्यांमधून १३.३१, मळीमध्ये साखर प्रमाण अधिक असणाऱ्या मळीपासून ५४.५४, तर सी हेव्ही म्हणजे त्यापेक्षा कमी शर्करांश असणाऱ्या मळीपासूनही इथेनॉलनिर्मितीला चालना देण्यात आली आहे. येत्या काळात जैव सीएनजी प्रकल्प वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

साखरेचे दर आणि उसाचा भाव, याचे गणित जुळत नसल्याने साखर उत्पादन कमी करणे आवश्यक आहे. इथेनॉलनिर्मितीबरोबरच आता जैव सीएनजीमध्येही साखर कारखान्यांनी उतरावे, असे प्रयत्न केले जात आहेत. रोहतक येथे असा एक प्रकल्प उभारण्यात आला असून त्याच्या पाहणीसाठी जाणार आहोत. त्यानंतर राज्यात असे किती प्रकल्प उभारायचे, याचे नियोजन केले जाईल.  – जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर संघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 1:47 am

Web Title: bio cng production now from sugar factories akp 94
Next Stories
1 शिवकालीन गड-किल्ले जगाच्या पटलावर आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न
2 वाढीव निधीसाठी मराठवाडय़ातील मंत्री आग्रही
3 ..तर कठोर निर्णय घेऊ : अजित पवार
Just Now!
X