वणवे लावून जैवविविधता नष्ट करणाऱ्यांचे प्रबोधन वनखात्याने करण्यास कुचराई केल्याने वन्य पशु-पक्षी सैरावैरा पळत आहेत. पक्ष्यांचे वसतिस्थानदेखील अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून, वन खाते मात्र हे सारे पाहत बसल्याने पर्यावरणप्रेमीत नाराजी व्यक्त होत आहे. इन्सुली, मळगाव, आंबोली-पारपोली अशा वनखात्याच्या जंगलांना सध्या वणवे लागले आहेत. हे वणवे धुमसत आहेत, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या बागायतींनादेखील वणवे लागल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या हंगामात डोंगरावर वणवे लावल्यानंतर पहिल्या पावसात जळणारा जाळ भात शेतीत येऊन खत मिळत असल्याने वणवे लावले जात असल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे अशा वणव्यामुळे बेसुमार वृक्षतोड झालेली दडवली जाते, असे सांगण्यात येते. या वणव्यामुळे कोवळी पालवी फुटून ती जनावरांना खाण्यास मिळते, असा तिसरा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
वनखात्यात जाळ रेषा काढण्याची परंपरा आहे. दरवर्षी जिल्ह्य़ाचा उपक्रम असूनही वणवे लागण्याचे थांबत नाही. वनखाते जाळरेषा काढल्याचे कागदोपत्री नोंद करते, पण प्रत्यक्षात हा निधी हडप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
जैवविविधतेचे नुकसान वणव्यामुळे होते. पशु-पक्षी सैरावैरा पळतात, सरपटणारे प्राणी वणव्यातून बचावतात किंवा मृत्यूही पावतात. पशु-पक्ष्यांची वसतिस्थानेदेखील नष्ट होत असतात त्यामुळे वणवे प्रतिबंध योजना आखण्याची गरज आहे.
वास्तविकता वणवेविरोधी जनजागृती करण्यासाठी वन खात्याने जंगलमय भागातील गावात प्रबोधन करण्याची गरज आहे, पण वृक्षतोडीचे फक्त पास देणारी यंत्रणा एवढेच काम वनखात्याला आहे, असा एक समज यामुळे वन खात्याविरोधात बनला आहे.