News Flash

“साताऱ्यात साकारणार जैवविविधता उद्यान, पोलीस दलाचे ३० एकर क्षेत्र आरक्षित”

- अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती

संग्रहीत

पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या पोलीस दलाच्या ३० एकर जागेवर सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन व क्रेडाईच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान उभे राहत आहे. हे उद्यान राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास सह्याद्री देवराई संस्थेचे प्रणेते तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सह्याद्री देवराईचे विजयकुमार निंबाळकर, मधुकर फल्ले, क्रेडाईचे अध्यक्ष जयंत ठक्कर, सागर साळुंखे, कमलेश पिसाळ आदी उपस्थित होते.

सयाजी शिंदे म्हणाले, “वृक्षलागवड व संवर्धन मोहीमेत अग्रेसर असलेल्या ‘देवराई’च्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात वृक्ष संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा करोनामुळे हे संमेलन ऑक्टोबर महिन्यात होईल. वृक्षचळवळ मोहीम बळकट व्हावी, यामध्ये तरूणांचा, महाविद्यालयांचा सहभाग वाढवा यासाठी प्रथमच निसर्गराजा व निसर्गराणी पुरस्कार देण्याचे देवराईचे नियोजन आहे. संबंधितांनी किती व कोणती झाडे लावली, किती झाडे जगविली याची पाहणी करून प्रत्येकी दहा-दहा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. महाविद्यालयात ज्या पद्धतीने क्रीडा स्पर्धा भरतात, त्याच धर्तीवर वृक्ष लागवड स्पर्धेचे आयोजन केले जाईल.”

तसेच, “हे करत असतानाच पुणे-बंगळुरू महामार्गालगत जैवविविधता उद्यान साकारण्याचा देवराईचा मनोदय आहे. या उद्यानासाठी पोलीस दलाने गोळीबार मैदानाची ३० एकर जागा देऊ केली आहे. या जागेवर देशातील सर्व भारतीय वृक्षांची लागवड केली जाईल. सुवासिक वनस्पती, गवताच्या प्रजाती, राज्य वृक्ष व राज्य फूल, दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या वनस्पती आदींची लागवड करून शेततळी, पाझर तलावाची निर्मितीही केली जाणार आहे. या कामास प्रारंभ झाला असून, यासाठी पोलीस दल व क्रेडाई संस्थेचे मोठे सहकार्य मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही काटेसावर महोत्सव साजरा केला जाणार असून, यावेळी तो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे होणार असल्याचेही सयाजी शिंदे यांनी सांगितले.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 3:04 pm

Web Title: biodiversity park to be set up in satara 30 acres of police force area reserved msr 87
Next Stories
1 “प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये, म्हणून…”
2 “कोविडचे नियम पाळून यावर्षीचा कृष्णाबाई उत्सव साजरा करावा”
3 शरद पवारांनंतर अजित पवारांचीही राज्यपालांवर टीका; म्हणाले…
Just Now!
X