जितेंद्र पाटील

जिल्ह्य़ातील शेतकरी मका पिकावरील लष्करी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आलेले असताना, भडगाव तालुक्यातील भोरटेकचे शेतकरी संजय महाजन यांनी जैविक कीडनाशकांच्या वापरातून त्यावर सहज मात केली आहे. कमी खर्चाच्या कीड नियंत्रण उपायांमुळे त्यांची रासायनिक कीटकनाशकांवरील खर्चात मोठी बचत झाली असून, उत्पादनातही चांगली वाढ झाली आहे.

भोरटेक शिवारात संजय महाजन यांची सुमारे १७ एकर शेती आहे. त्यात ते दरवर्षी ऊस, देशी कापूस, हळद, कांदा, मका तसेच भाजीपाला पिके घेतात. उल्लेखनीय म्हणजे शेतीत कोणत्याही रासायनिक निविष्ठांचा वापर करण्याचे टाळतात. गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीत पिकांचे अवशेष जागेवरच कुजविण्यावर त्यांचा भर राहिला आहे. याशिवाय शेणखताचा नियमित वापर केला जातो. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून पिकांची पाण्याची गरज कमी होण्यासह उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाल्याचा त्यांचा अनुभव आहे.

यंदाही त्यांनी कपाशीसह चार एकरावर मका पिकाची लागवड केली आहे. २२ जूनला लागवड झालेले मक्याचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागताच महाजन यांनी लागलीच उपाययोजनांवर भर दिला. नेहमीच्या अनुभवानुसार निंबोळी अर्क तसेच ‘मेटारीजियम एनीसोपली’, ‘बिव्हेरिया’ यांसारख्या जैविक कीटकनाशकांच्या फवारणी केल्या. यामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच नायनाट होऊन मक्याचे पीक निरोगी झाले. विशेष म्हणजे जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे फवारणीसाठी रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत खूपच कमी खर्च आला.

मक्याचे एकरी ४० क्विंटल उत्पादन

गेल्या वर्षीही त्यांनी जैविक कीड नियंत्रणाने मका पिकावरील लष्करी अळीवर सहजपणे मात केली होती. त्यामुळे मक्यापासून त्यांना एकरी सुमारे ४० क्विंटलपर्यंत उत्पादनही मिळाले होते. नगरच्या बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राकडून खरेदी केलेल्या जैविक कीड नाशकांचा शेतीत नियमित वापर केल्यामुळे महाजन यांचा विविध पिकांचा उत्पादन खर्च बराच कमी झालेला आहे. शिवाय सेंद्रिय शेती उत्पादने पिकविल्याचे समाधान त्यांना लाभले आहे. त्यांच्या शेतात उत्पादित सेंद्रिय वांग्याला दरवर्षी चांगली मागणीदेखील असते.

भोरटेक येथील शेतकरी संजय महाजन यांच्या शेतात यंदाच्या खरिपात लागवड केलेल्या मक्याचे लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेले नुकसान.