साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या सुरक्षेबाबत नवरात्र महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून यंदापासून पुजाऱ्यांना गाभाऱ्यात प्रवेशासाठी बायोमेट्रिक ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे बनावट पुजाऱ्यांना पायबंद बसणार आहे. मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा तहसीलदार आबासाहेब चौरे यांनी या संदर्भात तातडीने बायोमेट्रिक प्रणालीचे कामकाज पूर्ण करण्याचे आदेश जारी केले आहेत.
धार्मिक विधींसाठी गाभाऱ्याकडे जाताना पुजाऱ्यांना घटस्थापनेपासून बायोमेट्रिक ठसा लावून ओळख पटवून प्रवेश करावा लागणार आहे. तुळजाभवानी पुजारी मंडळ, भोपे व उपाध्ये पुजारी मंडळांच्या सुमारे तीन हजार पुजाऱ्यांना ही ओळखपत्रे दिली जाणार आहेत. यासाठी बुधवारपासूनच पुजाऱ्यांना मंदिरात येऊन आपल्या हाताच्या ठशांची नोंदणी करण्याची सूचना देण्यात आली. सकाळी अकरापासून ठसे घेण्याचे कामकाज अंबाजोगाई येथील ‘डिजिटल व्हॅली’ या खासगी कंपनीने सुरू केले. दुपारी चापर्यंत २८८ पुजाऱ्यांचे ठसे घेण्यात आले.
तुळजाभवानी मंदिरात पूजा करण्यासाठी परंपरेने सेवा करणाऱ्या सर्व पुजाऱ्यांना ही ओळखपत्रे युद्ध पातळीवर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी दिले. त्यानंतर व्यवस्थापक सुजित नरहरे व सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह मंदिर प्रशासनाकडून गेल्या चार दिवसांपासून पूर्वतयारी करण्यात आली. बुधवारी या कामाला सुरुवात झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथम उपाध्ये, नंतर भोपे व त्यानंतर पाळीकर पुजारी अशा क्रमाने ही नोंदणी केली जाणार आहे. ओळखपत्रासाठी अत्याधुनिक पद्धती वापरात येणार असल्याने प्रदीर्घ काळापासून अवैधरीत्या पुजारी व्यवसाय करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. मंदिरात मोठय़ा प्रमाणात बनावट पुजारी असल्याची चर्चा झाल्याने पारंपरिक पुजाऱ्यांना न्याय देण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
गर्दीच्या काळात ही प्रणाली वापरण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे बनावट पुजारी व्यवसाय करणाऱ्यांना चाप बसविण्यात संस्थान यशस्वी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, अमर परमेश्वर, अशोक श्यामराज यांनी या कामासाठी प्रशासनाला मदत केली जाईल, असे सांगितले.

‘सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत हवेत’
मंदिर संस्थानतर्फे मंदिरातील गरप्रकारांना चाप बसविण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. परंतु या कॅमेऱ्यांची क्षमता निकृष्ट असल्यामुळे स्पष्ट छायाचित्रण होत नाही. चित्रीकरण स्पष्ट नसल्यामुळे अशा बनावट पुजाऱ्यांवर कारवाई होऊ शकली नाही. भाविकांशी होणारी हुज्जत, देवीचरणी केल्या जाणाऱ्या मौल्यवान वस्तूंची लूट, यास पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज काही पुजाऱ्यांनी व्यक्त केली.