पक्षी प्रेमींसाठी पर्वणी ठरणारा दोन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षी महोत्सव २० ते २१ फेब्रुवारीला ताडोबातील मोहार्ली इंटरप्रेटेशन सेंटरमध्ये होत आहे. पक्षी निरीक्षणाचा छंद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हा महोत्सव आयोजित करण्याचा मुख्य हेतू आहे.  
या दोन दिवसीय पक्षी महोत्सवात पक्ष्यांवर आधारित माहितीपट, व्याख्याने व पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा महोत्सव नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे.  २० व २१ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत मोहार्ली इंटरप्रेटेशन सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय माहितीपट दिग्दर्शक बेदी बंधू, शेकर दत्तात्री, असीमा नरेन, विलास काणे यांनी तयार केलेल्या पक्ष्यांवर आधारित माहितीपटांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तामिळनाडू येथील पाँईट कॅलिमर येथे दरवर्षी मोठय़ा संख्येने स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. या पक्ष्यांवर प्रकाश टाकणारा माहितीपट पाँईंट कॅलिमर दाखवण्यात येईल.
कर्नाटकातील म्हैसूर जवळील रंगनथिट्ट पक्षी अभयारण्यात माहितीपट तसेच भारतातील अत्यंत दुर्मीळ असा माळढोक पक्षावर आधारित माहितीपटांचा या महोत्सवात समावेश आहे. त्याचप्रमाणे एका विद्यार्थ्यांने तयार केलेल्या घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या पक्ष्यांवर आधारित माहितीपट दाखविण्यात येईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पक्षीजीवन या विषयावर शैलेश तुळपुळे यांचे व्याख्यान होईल. महोत्सवाचा शेवट उत्तर पूर्व भागात होणाऱ्या पक्षी व प्राण्यांची शिकर या विषयावरील पांडा पुरस्कारप्राप्त रिटा बॅनर्जी दिग्दíशत माहितीपटाने होईल.  २१ फेब्रुवारीला ताडोबा मोहार्ली गेटच्या परिसरात सकाळी ६.३० ते ८.०० या कालावधीत पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला मार्गदर्शनाकरिता पक्षी अभ्यासक उपस्थित राहणार आहेत.