राज्यात गेल्या पाच दिवसांपासून १८३९ पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यातील २१८ पक्षी मंगळवारी दगावले, असे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव दिसून आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ‘बर्ड फ्लू’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. सिंह म्हणाले, यवतमाळ जिल्ह्य़ात २००, अमरावती जिल्ह्य़ात ११ आणि अकोला जिल्ह्य़ात तीन असे २१४ कुक्कूट पक्षी मंगळवारी दगावले. अकोला जिल्ह्य़ातील चार कावळेही मृत आढळले आहेत. संबंधित नमुने तपासणीसाठी भोपाळ तसेच पुण्यात पाठवले आहेत.
मुंबई, ठाणे आणि दापोली येथील कावळे आणि बगळे तसेच परभणी जिल्ह्य़ातील मुरुंबा या कुक्कुट पालन केंद्रातील मृतावस्थेतील पक्ष्यांना ‘बर्ड फ्लू’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. लातूर येथील नमुन्यांमध्येही संसर्ग आढळल्याने परिसराला संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच परभणी जिल्ह्य़ातील मुरुंबा येथील ५५०० आणि लातूर येथील १०,००० पक्षी तसेच ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणापासून १ किमी त्रिज्येच्या परिसरातील सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात आतापर्यंत १२१ पक्षी मृतावस्थेत
ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ भागात मृतावस्थेत आढळलेल्या १५ पैकी ३ बगळे आणि एका पोपटाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले असून संपुर्ण ठाणे शहरात विविध जातीचे १२१ पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात दक्षता बाळगली जात आहे. या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालांची प्रतीक्षा असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
चिकन, अंडी सेवन सुरक्षित
अंडी आणि चिकन यांसारखे पदार्थ ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ले असता विषाणू निष्क्रिय होतात. त्यामुळे अंडी किं वा चिकन सेवन पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाने केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 2:45 am