देशातील इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’चा संकटानं डोकं वर काढलं आहे. परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.

आणखी वाचा- बर्ड फ्ल्यू – अंडी, चिकन खाणाऱ्यांना पशूसंवर्धमंत्र्यांनी केली अत्यंत महत्वाची सूचना

कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे आदेश देण्यात आले असून, दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

मुरुंबा गावात बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. मुरुंबा गावातील १ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.

आणखी वाचा- राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट

बीड जिल्ह्यातील कावळ्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे. मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी  मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.