बीड जिल्ह्यत एकेकाळी स्त्री भ्रूण हत्येमुळे घटत चाललेला जन्मदर चिंताजनक अवस्थेत आला होता. मात्र मुलींना जन्म देण्याबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले असून आज एक हजार मुलांमागे ९३७ मुली असा उच्चांकी जन्मदर झाल्याचा दावा, ग्रामविकास व महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. परळी मतदार संघाचा विकास करताना ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे हे मी कधीच बघितले नाही. जात, धर्म, पंथ, पक्ष बाजूला ठेवून केवळ सामान्य माणसाच्या हितासाठी प्रत्येक गावात भरभरून निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

परळी तालुक्यातील नागापूर येथे मंगळवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अडीच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आदींची उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या खडका बंधाऱ्याचा उपयोग होत आहे. मात्र अत्यल्प पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात आणि तेथून खडका बंधाऱ्यात सोडण्याची कार्यवाही शासनस्तरावरून सुरू झाली आहे. भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वाण व पोहनेर नदीवर बंधारे बांधणी, जायकवाडीचे पाणी लिफ्ट पद्धतीने वाण धरणात सोडण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. हा भाग वॉटरग्रीड प्रकल्पात समाविष्ट करून त्यातील सर्व आवश्यक त्या कायदेशीर बाबींवर तोडगा काढण्याची ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली. आज ग्रामीण भागात शंभर टक्के स्वच्छतागृहे झाली आहेत. आयुष्मान भारत, उज्ज्वला गॅस, सौभाग्य योजना, घरकुल आदि योजनांचा लाभ गोरगरिबांना दिला आहे, असे सांगत बीड जिल्ह्य़ात स्त्री भ्रूण हत्येसारखे प्रकार घडल्यानंतर घटलेला मुलींचा जन्मदर आता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.