राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या ‘शंखनादा’नंतर गुरुवारपासून मनसेचे घंटानाद आंदोलन सुरु झालं आहे. भाजपने सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी मंदिरांबाहेर शंखनाद आंदोलन केले. भाजपच्या सुरात सुर मिसळत राज ठाकरे यांनीही मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. मंदिरांच्या मुद्द्यांवरुन भाजपा आणि मनसे एकच मागणी करत असताना आजा भाजपाच्या आचार्य तुषार भोसलेंनी कठोर शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. प्रत्येक मंदिरात जर एक ‘ठाकरे-पवार दानपेटी’ बसवली तर मग मंदिरं उघडली जातील का?, असा प्रश्न भोसले यांनी राज्य सरकारला विचारलाय.

“ज्या गोष्टीत आपल्याला वसुली करता येते केवळ त्यांनाच सवलत द्यायची, हा ठाकरे सरकारचा मुख्य नियम आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिरात जर एक ‘ठाकरे-पवार दानपेटी’ बसवली तर मंदिरं उघडली जातील का ? हा आमचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. येणारे भाविक-भक्त हा औरंगजेबासारखा ठाकरे पवारांचा ‘झिझीया कर’ समजून त्या दानपेटीत १०-२० रुपये टाकत जातील,” अशी टीका भोसले यांनी केली आहे.

तसेच सर्वसामान्यांसाठी राज्यातील मंदिरं बंद असताना प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मात्र व्हीआयपी लोकांना दर्शन देण्यात येत असल्याच्या लोकसत्ता ऑनलाइनने दिलेल्या बातमीवरुन भोसले यांनी खोचक शब्दात राज्य सरकारला टोला लगावला आहे. “नाहीतरी आजही अनेक ‘खास’ लोकं या तुमच्या दान पेटीत दान टाकूनच मागच्या दाराने दर्शन घेत आहेत,” असं भोसले म्हणालेत. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यावरुनच ही टीका करण्यात आलीय.

आशीष शेलार यांची टीका…

राज्य सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केला असून वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, अन्यत्र कडक निर्बंध  राहतात. शिवसेना राज्यसभा खासदाराच्या जावयाकडून चित्रपटगृहमालकांशी वाटाघाटी सुरू असल्याचा आरोप भाजप आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी केला. त्यामुळेच हॉटेल, बारमालकांशी ‘वाटाघाटी’ झाल्यावर निर्बंध शिथिल झाले. तर दुसरीकडे आर्थिक अडचणीत असलेले मराठी चित्रपट व नाट्य कलावंत, लोककलावंत, मंदिरांजवळ धूप, अगरबत्ती, फुले विकणारे व्यावसायिक आहेत. ते ‘वाटाघाटी’ करू शकत नाहीत, म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे. हा वाटाघाटीचा धंदा बंद करावा. आता गणेशोत्सव व नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटाघाटी करणार का? असा सवाल करीत शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

राज ठाकरेंचीही टीका

‘जनआशीर्वाद यात्रा, मेळावे, परस्परांविरोधात आंदोलने होत आहेत. परंतु सण आला की करोनाचे कारण देत निर्बंध कठोर केले जातात. ‘लॉकडाऊन आवडे सर्वाना’ अशी राज्य सरकारची परिस्थिती आहे,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारला लक्ष्य केले. ‘नियम सर्वाना सारखे असले पाहिजे. एकाला एक नियम तर दुसऱ्याला दुसरा, हे बरोबर नाही. शिवसेना विरोधात असती तर त्यांनी काय केले असते, असा सवाल ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ‘ते घराबाहेर पडण्यास घाबरत असतील, त्याला आम्ही काय करणार’, असा मुख्यमंत्र्यांना टोला लगावत, ज्यांना सण साजरे करायचे आहेत, त्यांना ते करू द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

 तेव्हा करोना कुठे जातो ?

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी बळकावलेल्या महापौर निवासाबाहेर विकासकांच्या गाड्या येत असतात. बैठका सुरू असतात. पण, सूडबुद्धीने दहीहंडीच्या आयोजनावर, मंदिर प्रवेशावर बंदी घातली जात आहे.  भास्कर जाधव यांच्या मुलासाठी मंदिरे खुली आहे. क्रिकेट, फुटबॉल असे सगळे सुरू आहे. पण आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही, हे कसे चालेल, असा सवालही राज यांनी उपस्थित केला.