गंगाखेड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची तक्रार जिल्हा सरचिटणीस डॉ. सुभाष कदम यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात दिली. उमेदवारीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीनंतर ही घटना घडली. परभणी येथे घडलेल्या या हाणामारीवर माजी आमदार विजय गव्हाणे यांना दोषी धरून त्यांनी स्वार्थापोटी पक्ष संपवला, असा आरोप जिल्हाध्यक्ष रबडे यांनी केली.
 रविवारी येथील सिटी पॅलेस हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रकार बैठकीत गव्हाणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. गंगाखेडच्या उमेदवारी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सुटल्याचे गव्हाणे यांनी स्पष्ट केले. हा निर्णय पक्षाने घेतलेला आहे, असे ते म्हणाले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांवर झालेला हा अन्याय नाही काय, असा प्रश्न यावेळी गव्हाणे यांना विचारला गेला. त्यावेळी या मतदारसंघातून भाजपचे एक दावेदार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाने आपल्यावर अन्याय केला नाही, पण जिल्ह्य़ातील नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. नांदेडच्या डॉ. संजय कदम यांना उमेदवारी द्यावी म्हणून गव्हाणे, रोकडे यांनी प्रयत्न केले, तर रामप्रभू मुंडे यांनी आमदार सीताराम घनदाट यांना पूरक भूमिका घेतली. जिल्ह्य़ातल्या नेत्यांनीच असे वर्तन केल्याने आपोआपच ही जागा अन्य घटक पक्षाकडे गेली. स्वत:च्या स्वार्थापायी जिल्ह्य़ातल्या राजकीय नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाचे राजकीय नुकसान झाले, अशी भूमिका रबदडे यांनी मांडली.
त्यानंतर पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. सुभाष कदम आणि गव्हाणे यांचे बोलणे चालू होते. त्याच वेळी लिंबाजी भोसले यांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार कदम यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात दिली. या हाणामारीत आपला मोबाईल व रोख साडेसहा हजार रुपये चोरीला गेल्याचे कदम यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दोन गटात जी हाणामारी झाली, त्याची चर्चा नंतर शहरात जोरदार सुरू झाली. आपण कदम यांना का धमकी देता, थेट मला बोला, असे रबदडे गव्हाणे यांना म्हणाले. परभणीतल्या या प्रकाराने भाजपचेही कार्यकर्ते गांगरून गेले.
दरम्यान, गव्हाणे यांनी स्वत:च्या आर्थिक स्वार्थापोटी जिल्ह्य़ात पक्ष संपवला, असा आरोप जिल्हाध्यक्ष रबदडे यांनी केला. जिल्ह्य़ात कोणत्याही निवडणुकीत भाजपला राजकीय यश मिळत नाही, याचे कारण केवळ दलाली आणि तडजोडी हेच आहे, असेही ते म्हणाले.