राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या (मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी) राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनांमध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे उद्या दुपारी १२ ते ३ या वेळेत धरणे आंदोलन होणार असुन, यामध्ये आपण स्वतः सहभागी होणार असल्याचेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत.

महाविकासआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत दिली नाही, फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली असल्याचा आरोप करत, या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले. तसेच, या धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.