गोंधळात कोणतेही विधेयक मंजूर न करता चर्चा करण्याची सरकारची तयारी होती. मात्र, काँग्रेसचे खासदार गोंधळ करत आहेत. शेतीच्या प्रश्नावर तसेच भूसंपादन विधेयकावर चर्चा करायची होती. मात्र, त्यांनी चर्चा केली नाही. याचा अर्थ ते आम्हाला भारी पडले असा होत नाही. संसदेची परंपरा मात्र त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. गोंधळात विधेयक मंजूर करता आली असती पण तसे केले नाही. कारण चर्चा व्हायला हवी, असे भाजपचे मत आहे. त्याला विरोध करणाऱ्या खासदारांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले जात असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
शहरातील क्रांती चौक येथे काँग्रेस विरोधातील या आंदोलनात सहभागी होणाऱ्या भाजप नेत्यांनी राहुल गांधी व सोनिया गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच काँग्रेसच्या गोंधळी खासदारांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. आमदार अतुल सावे, नारायण कुचे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, उपमहापौर प्रमोद राठोड, महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, प्रवीण घुगे आदींसह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. या वेळी बोलताना खासदार दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या आरोपाचा खुलास केला. मात्र, कामकाज चालू द्यायचे नाही, असेच धोरण असल्याने काँग्रेसने गोंधळ घातला. तो देशाच्या हिताचा नाही, हे कळावे म्हणून हे आंदोलन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी स्थिती हाताळण्यात सरकार सक्षम असून पालकमंत्री भेटी देत आहेत. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल, असेही दानवे यांनी या वेळी सांगितले. ‘तहलका’ मासिकातील शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचा केलेला उल्लेख चुकीचा आहे. ते देशभक्त होते. त्यामुळे मासिकात काय छापून आले ते पाहू आणि कारवाई करावी की नाही हे पाहू, असेही ते म्हणाले.