भाजपाचा सगळा प्रचार व्यक्तिकेंद्रित स्वरूपाचा आहे. नरेंद्र मोदी म्हणजे भाजपाचा जाहीरनामा असून मूळ जाहीरनाम्याकडे पक्षाने दुर्लक्ष केलेले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने जे काही विधायक स्वरूपाचे कार्य केले आहे. त्याला मोदींच्या फॅसिस्ट प्रवृत्तीमुळे धोका निर्माण झाला आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडीक यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री चव्हाण यांनी रात्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही मित्रपक्ष प्रथमच एकदिलाने प्रचारात उतरलेले आहेत. एक-दोन मतदारसंघातील अपवाद वगळता सर्वच ठिकाणी समन्वयाने प्रचार यंत्रणा गतिमान झालेली आहे. राज्यात कोणतीही लाट दिसत नसल्याने सर्वाधिक जागांवर आघाडीचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकणात निर्माण झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांतील गोंधळाबाबत ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व आमदारांसह काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी हा सर्व प्रश्न सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत आहे. खासदार नीलेश राणे यांच्यावर राष्ट्रवादीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. राणे यांच्यावर आक्षेप घेणारे वगळता उर्वरित राष्ट्रवादीचे कार्यकत्रे त्यांना प्रचारासाठी मदत करणार आहेत. आचारसंहितेची अंमलबजावणी करताना प्रशासन अतीच वागत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी पवारांची भूमिका काही प्रमाणात खरी असल्याचे म्हणत त्याचे समर्थनच केले.
पंतप्रधान कार्यालयाचे माजी प्रसिध्दी सल्लागार बारु यांच्या पुस्तकासंदर्भात मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, पंतप्रधानांना टीकेचे धनी ठरविणारे हे पुस्तक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाशित होण्याला वेगळा अर्थ आहे. मी पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत असताना बारु यांनी माझ्यासमवेत काम केले आहे. त्यांना पंतप्रधान निष्क्रीय असल्याचे वाटत होते तर ते त्यावेळी का गप्प बसले होते, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे.