नरेंद्र मोदी दिल्लीत पुन्हा विराजमान होत असताना देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. मोदी-2 सरकारचा चेहरा मोदी हाच आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून म्हटलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच. शहा यांच्या येण्याने मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

मोदी यांचे मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत उत्सुकता असण्याचे तसे कारण नव्हते. मोदी व शहा यांना जे हवे तेच मंत्रिमंडळात आले व जे नको ते बाहेर राहिले. मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा आता स्पष्ट झाला आहे. राजनाथ सिंह, नितीन गडकरी वगळले तर ‘दिग्गज’ किंवा ‘हेवीवेट’ म्हणावेत असे फारसे कोणी दिसत नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाचे नाव आहे ते अमित शहा यांचे. भाजप विजयाचे शिल्पकार अमित शहा आहेतच. त्यामुळे ते मंत्रिमंडळात येण्याविषयी अटकळ बांधली जात होती. त्यावर आता पडदा पडला आहे. भाजपवर शहा यांचे पूर्ण नियंत्रण आलेच आहे. आता मोदी यांच्या वतीने सरकारवरही त्यांचे नियंत्रण राहील असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

अमित शहा हे कोणते खाते स्वीकारतात? गृह खाते की संरक्षण खाते? अरुण जेटली यांनी निवृत्ती पत्करल्यामुळे अर्थ खात्यास शहा यांचे नेतृत्व मिळतेय का हे पाहण्यासारखे आहे. शहा यांनी संरक्षण खाते स्वीकारले तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल असा लोकांचा विश्वास आहे. त्यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. शिवाय कश्मीरात 370 कलम हटविण्याची घोषणा त्यांनी केली आहे, त्या कार्यास गती मिळेल. समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अमित शहा यांची इच्छा होतीच. देशभावनासुद्धा तीच असल्याने समान नागरी कायद्याबाबतचे वीर सावरकरांचे स्वप्नही साकार होईल. नक्षलवाद आणि माओवाद्यांचा हिंसाचार मोडून काढला जाईल. शहा हे अर्थमंत्री झाले तर विकासकामांना आणि आर्थिक सुधारणांना गती मिळेल. शेतकरी व कष्टकऱ्यांना लाभ मिळतील. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या प्रयत्नांना गती मिळेल. मुख्य म्हणजे ‘डॉलर’च्या तुलनेत रुपयाची घसरण रोजच सुरू आहे. त्या घसरणीस खो बसेल. शहा यांच्या येण्याने मोदी सरकारला बळ मिळेल असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे.