अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने चालविला असून या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्य़ातील गडावरील शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि विविध नद्यांमधील जल स्मारकाच्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ातील पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना, आमदार, खासदारांना कलश मिरवणूक काढून त्याचा प्रचार करण्याचे आदेश पक्षीय पातळीवरून देण्यात आले आहेत.

मुंबईजवळ अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक राज्य शासन उभा करीत असून याचे भूमिपूजन २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाची जाहिरातबाजी करण्याचे प्रयत्न जिल्हा पातळीवर भाजपने सुरू केले असून यासाठी विविध ठिकाणी जल कलशाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

नव्वदच्या दशकामध्ये अयोध्येत राम मंदिरासाठी शिलापूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून घेण्यात आला होता. याच धर्तीवर अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. एकीकडे पक्षीय पातळीवरून याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू असतानाच प्रशासकीय पातळीवरूनही प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हाधिकारी यांना शिवाजी राजांच्या स्मारकासाठी जिल्ह्य़ातून कोणत्या गडावरील माती नेण्यात येणार आहे, कोणत्या नदीचे तीर्थ नेण्यात येणार आहे याची माहिती प्रसिद्धीमाध्यमाद्बारे सांगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकल मराठा मोर्चामुळे संघटित झालेल्या मराठा मतदारांना शिवाजी महाराजांचे स्मारक आम्हीच करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न यानिमित्ताने चालविला असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. शिवाजी महाराज हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असून शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवस्मारकासाठी जिल्ह्य़ातून नेण्यात येणाऱ्या माती आणि जलकुंभाची मिरवणूक काढण्याचे आदेश मतदारसंघातील भाजप आमदार व जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत.