News Flash

भीमा कोरेगाव घटनेमागे भाजप, संघ आणि जातीयवादी संघटनांचा हात ; मायावतींचा आरोप

भीमा कोरेगाव येथील हिंसाचार रोखता आला असता

फोटो सौजन्य-एएनआय

भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात तर बघायला मिळालेच पण आता राष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेतली जाते आहे. बसपा नेत्या मायावती यांनी भीमा कोरेगावमधील हिंसाचारामागे भाजपचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

भीमा कोरेगावमध्ये जी घटना घडली ती घडणे थांबवता येणे शक्य होते. सरकारने त्या ठिकाणी सुरक्षेचे योग्य उपाय योजणे आवश्यक होते. मात्र महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे आणि त्यांनी भीमा कोरेगाव भागात हिंसाचार घडवून आणला असा गंभीर आरोप मायावती यांनी केला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहे. या हिंसाचारामागे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जातीयवादी शक्तींचा हात आहे असे बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी म्हटले आहे.

भीमा कोरेगाव या ठिकाणी सोमवारी घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटताना दिसले. पुण्यातील भीमा कोरेगाव भागात असलेल्या शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आंबेडकरी अनुयायी वर्षाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी आले होते. या शौर्य स्तंभाचे यंदाचे २०० वे वर्ष आहे त्यामुळे या कार्यक्रमाला खास महत्त्व होते. मात्र किरकोळ कारणावरून या ठिकाणी हिंसाचार उसळला आणि त्याचे रूपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. या सगळ्यामुळे सोमवारचा पूर्ण दिवस आणि रात्र या भागात तणाव होता. ही बातमी प्रसारमाध्यमांच्या मदतीने राज्यभरात पसरली आणि मुंबईसह राज्यभरात या बातमीचे पडसाद बघायला मिळाले.

दरम्यान भीमा कोरेगावच्या घटनेने संघ आणि भाजपा दलितविरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राज्यभरात सध्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळातही या सगळ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही या घटनेमागे भाजप, संघ आणि जातीयवादी संघटनांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2018 8:44 pm

Web Title: bjp and rss behind bhima koregaon incident says mayavati
Next Stories
1 काय आहे भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा इतिहास?
2 भीमा कोरेगावची घटना ही संघ व भाजपा दलितविरोधी असल्याचे ठळक उदाहरण- राहुल गांधी
3 भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंविरोधात पिंपरीत गुन्हा
Just Now!
X