२०१८मधील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर राज्यात वादविवाद सुरू झाला आहे. याप्रकरणात भाजपानं अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेलार म्हणाले, “नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, ही भाजपा भूमिका स्पष्ट आहे. मात्र, नाईक परिवाराची केस दाखवून स्वत:चा सूड घ्यायचा राज्य सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. अशा बंद केसेस पुन्हा ओपन करण्यास लागलो, तर ठाण्यातील परमार बिल्डरची केसही ओपन करावी लागेल. त्या घटनेतल्या सुसाईड नोटमध्ये ज्यांचे नाव आहे, त्यानुसार राज्य सरकारला पळता भूई थोडी होईल. या घटनेवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया द्यावी,” असं आवाहन शेलार यांनी केलं आहे.

“सर्वजण आज मात्र गप्प बसलेत”

”नियतीचं कालचक्र कसं असतं ते आजच्या अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. १९७४ साली इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने देशात आणीबाणी जाहीर केली, तेव्हा शिवसेनेनं त्याचं समर्थन केलं होतं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दबावाखाली येऊन सूडबुद्धीनं कारवाई करत आणीबाणीचे जणू व्यवस्थापनच केल्याचे चित्र आहे. संविधानरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवणारे सर्वजण आज मात्र गप्प बसले आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली.

“…कारण ही राजघराणी आहेत”

“महाविकास आघाडी सरकारनं ही कारवाई केवळ गांधी परिवाराच्या आदेशानुसार केली आहे. या घटनेनंतर तीन संकेत मिळतात ते म्हणजे गांधी परिवाराला आणि ठाकरे परिवाराला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत कारण ही राजघराणी आहेत. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले, तर कारवाई केली जाईल. ठाकरे परिवाराच्या हिंदुत्वाला अडचणीत आणणारे प्रश्न माध्यमांनी विचारू नयेत. हिंदुत्वाविषयी आणि देशहितासंदर्भात जे-जे पत्रकार प्रश्न विचारतील, त्या सर्व पत्रकारांवर अशीच कारवाई केली जाईल, यांचे संकेत या घटनेतून मिळतात. महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात आतापर्यंत ५७ पत्रकारांवर केसेस दाखल केल्या गेल्या आहेत. तसेच सरकारविरोधात जे कोणी सामान्य व्यक्ती बोलत आहेत, त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे,” असा धक्कादायक आरोप शेलार यांनी केला.