महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या. यावेळी काहींनी या अर्थसंकल्पाची स्तुती केली. तर काहींनी या अर्थसंकल्पावर टीका केली. यावेळी भाजपा नेते आशिष शेलार यांनीदेखील अर्थसंकल्पावर टीका केली. “कोकण आमचे वैभव,असे काल संध्याकाळी म्हणाले सकाळी अर्थसंकल्प मांडताना म्हणाले ‘इसरलय.!” असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

आशिष शेलार यांनी ट्विटरवरून सरकावर टीकेचे बाण सोडले. “कोकण आमचे वैभव,असे काल संध्याकाळी म्हणाले सकाळी अर्थसंकल्प मांडताना म्हणाले ‘इसरलयं.!’कोकणातील शेतकरी, मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली. कोकणावरचे तिघाडीचे प्रेम आज खरे दिसले. हाजीअली दर्ग्यालाचा विकास मात्र न चुकता जाहीर केला. सिंधुदुर्ग किल्ल्याचा मात्र विसर पडला,” असं आशिष शेलार म्हणाले.

अर्थसंकल्पाला ‘कुछ ना करोना’ची गती
एकीकडे “कोरोनाची भीती आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाला ‘कुछ ना करोना’ची गती.. कारणे सांगत ‘क’ ची बाराखडी वाचली.. नवीन काही नाही.. ना गरिबाची काळजी ना शेतकऱ्यांची.. ना मुंबईकरांची.. तीन चाकाच्या सरकारची रिक्षापेक्षा “मायनस” गती! अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

मुंबई कमजोर आणि बारामतीवर जोर
“अर्थसंकल्प राज्याचा आणि तरतुदी मात्र पुण्याच्या… मुंबईकरांसाठी ००,००,००० करोड… बारामतीकरांच्या संस्थांनाच अनुदानाचा जोर… मुख्यमंत्री मुंबईकर! अर्थसंकल्प मात्र बारामतीकर!! पुरवणी मागण्याप्रमाणे अर्थसंकल्पातही मुंबई कमजोर आणि बरामतीवर जोर!,” असं ट्विट करत शेलार यांनी सरकारला टोला हाणला आहे.