भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिल्लीमध्ये ही भेट पार पडली. याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली होती. या भेटीनंतर लगेचच आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. आशिष शेलार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीचं नेमकं कारण सांगितलं.

आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेत मराठा आरक्षणावर चर्चा केली. “मराठा आरक्षण प्रकरणी मराठा तरुणांच्या भावना शरद पवारांना माहिती आहेत. या भावना अतिशय तीव्र आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आऱक्षणाची बाजू मांडताना या विषयाचं गांभीर्यही शरद पवारांना माहिती आहे,” असं आशिष शेलार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट करावी तसंच आरक्षणाविषयी तातडीने योग्य कायदेशीर पावलं लगेच उचलावीत याबद्दल सुद्धा शरद पवारांसोबत चर्चा केली”.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मंगळवारी सकाळी अशोक चव्हाण शरद पवारांना भेटायला पोहोचले होते. विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर यांनीही शरद पवारांची भेट घेतली. काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष बदलांच्या चर्चेवर शरद पवारांसोबत यावेळी चर्चा झाली.